राजरत्न सिरसाट/अकोलाश्वानाच्या प्रजननपूर्व काळात मादीच्या अंगावर विशिष्ट सुगंधी द्रव्य (डीओड्रंट) शिंपडल्यास नर कुत्र्यांना या काळात होणारे आकर्षण टाळणे शक्य आहे. अकोला येथील स्नातकोत्तर पशुवैद्यकीय व पशुविकास संस्थेने (पीजीआयव्हीएस) हा अफलातून फॉर्म्युला शोधला आहे. मोकाट श्वानांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी, हा फॉर्म्युला नामी ठरेल, असा दावा या संस्थेने केला असून, याबाबतची शिफारस महापालिकांना केली जाणार आहे.मोकाट कुत्र्यांची (श्वान) संख्या मोठय़ा प्रमाणात वाढत असून, या कुत्र्यांच्या चाव्याने रॅबीजसारखा घातक आजार वाढल्याचे चित्र आहे. राज्यात आजामितीस १२ लाख ६५ हजार ६९७ एवढे कुत्रे असून, एकट्या अकोला जिल्ह्यात ही संख्या ११00८ एवढी आहे. या संख्येत उत्तरोत्तर वाढ होतच आहे. शहर तसेच ग्रामीण भागातही कुत्र्यांचे प्रमाण वाढले आहे. कुत्रे कळपाने वावरत असल्याने, कुत्रे चावण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. परिणामी स्थानिक स्वराज्य संस्थांना या कुत्र्यांना पकडून दूरवर सोडावे लागत आहे. तरीही कुत्र्यांची संख्या वाढतच आहे. अनेक वेळा शहरातून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या अभयारण्यात शहरातील मोकाट कुत्री सोडली जातात. त्यातील अनेक कुत्र्यांना खरूज किंवा विविध आजार असतात. ही कुत्री वन्य प्राण्यांनी भक्ष्य केल्यास, त्यांनाही वेगवेगळे आजार होण्याची शक्यता असते. म्हणून कुत्रे जंगलात किंवा अभयारण्यात सोडणे, यावर उपाय नाही. मादी कुत्र्यांची शस्त्रक्रिया अवघड आणि खर्चिक आहे. यावर उपाय म्हणून महाराष्ट्र पशुविज्ञान विद्यापीठांतर्गत कार्यरत अकोल्याच्या पीजीआयव्हीएएस या संस्थेने नवीन फॉर्म्युला शोधला आहे. मादी कुत्र्यांचा प्रजननपूर्व काळ हा श्रावण, भाद्रपद महिन्यात असतो. या काळात मादी कुत्रा (श्वान) नर श्वानापासून कितीही अंतरावर असला, तरी मादीच्या प्रजननपूर्व काळातील विशिष्ट द्रवाचा सुगंध काही किलोमीटरपर्यंत कुत्र्यांना येतो. म्हणूनच त्या काळात कुत्रे त्या विशिष्ट द्रव्याच्या सुवासामुळे आकर्षित होतात. या काळात मादी कुत्र्यावर विशिष्ट सुगंधी द्रव्य (डिओड्रंट) शिंपडल्यास मादीतील नैसर्गिक विशिष्ट द्रव्याचा सुगंध नष्ट होतो. परिणामी नर कुत्र्याचे आकर्षण कमी होते.
कुत्र्यांच्या वाढत्या संख्येला बसणार आळा!
By admin | Published: February 20, 2016 2:09 AM