गतवर्षी डिसेंबर अखेरीस घसरणीला लागलेला कोरोनाचा आलेख फेब्रुवारी महिन्याच्या उत्तरार्धापासून पुन्हा उंचावला असून, ही लाट एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत उच्च पातळीवर पोहोचली आहे. शंभर ते दोनशेच्या घरात नोंदविली जाणारी दैनंदिन रुग्णसंख्या ५०० ते ७०० पर्यंत जाऊन ठेपली आहे. सोबतच मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढतच आहे. रुग्णसंख्या दररोज नवनवा विक्रम प्रस्थापित करत असल्याने आरोग्य यंत्रणा हतबल झाली आहे. दरम्यान, राज्य सरकारने एक मे पर्यंत कडक निर्बंध लागू केल्याने बाजारपेठांमधील गर्दी ओसरली असून, त्याचे चांगले परिणाम आता समोर येत आहेत. शनिवार, २३ एप्रिलपासून नव्याने पॉझिटिव्ह आढळणाऱ्यांची संख्या सातत्याने घटत असून, त्या तुलनेत बरे होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. गत चार दिवसांत तब्बल २८५८ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे, तर या कालावधीत नव्या १८३४ रुग्णांची भर पडली आहे.
मृत्युसत्र रोखण्याचे आव्हान
अकोला जिल्ह्यात दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख किंचित घटत असला, तरी कोरोनाला बळी पडणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६५५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गत चार दिवसांतच ४५ जण कोरोनामुळे दगावले आहेत. लक्षणे गंभीर स्वरूप धारण करेपर्यंत रुग्णालयात न जाण्याच्या रुग्णांच्या प्रवृत्तीमुळे अनेकांना जीव गमवावा लागत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
लक्षणे दिसताच चाचणी करून घेऊन उपचार घेतल्यास कोरोनावर मात करणे शक्य आहे. काही रुग्ण गंभीर अवस्थेत रुग्णालयात येतात, त्यामुळे रुग्ण दगावण्याची शक्यता असते. अंगावर दुखणे न काढता तातडीने चाचणी करून घेऊन उपचार सुरू करावा.
डॉ. राजकुमार चव्हाण.
जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला
गत चार दिवसांतील रुग्णसंख्येचा आलेख
शनिवार
पॉझिटिव्ह कोरोनामुक्त
४९४ ५९४
रविवार
पॉझिटिव्ह कोरोनामुक्त
४६९ ७७५
सोमवार
पॉझिटिव्ह कोरोनामुक्त
३७१ ७३७
मंगळवार
पॉझिटिव्ह कोरोनामुक्त
५०० ७५२