अनंत वानखडे
बाळापूर: तालुक्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण व दैनंदिन रुग्णसंख्या झपाट्याने घसरली आहे. गत आठवड्याभरात केवळ १२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे. सद्यस्थितीत तालुक्यात २३ रुग्णांवर उपचार सुरू असून, ही सर्व पॉझिटिव्ह रुग्ण ग्रामीण भागातील असून, शहर कोरोनामुक्त झाले आहे. तालुक्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. पॉझिटिव्ह रुग्णसंख्याही नियंत्रणात ठेवण्यात प्रशासनाला यश आले आहे; मात्र लहान मुलांसाठी धोकादायक असलेली तिसरी लाट थोपविण्याचे आव्हान कायम आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जिल्ह्यासह तालुक्यात थैमान घातले होते. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत खूप मोठी वाढ पाहायला मिळाली. मृत्यूचे प्रमाण तर अतिशय चिंताजनक बनले होते. फेब्रुवारी ते मे या तीन महिन्यांच्या कालावधीत अनेकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला. तसेच पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सद्यस्थितीत कोरोनाचा आलेख घसरत असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
-----------------------------
संकट कायम, सुरक्षा गरजेची!
जून महिन्याच्या सुरुवातीपासून दिलासादायक परिस्थिती निर्माण होण्यास सुरुवात झाली. मात्र तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली असल्याने संकट कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी बेफिकीर न राहता सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
-------------------
बाळापूर तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने घसरली आहे. त्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. नागरिक बाजारपेठेत गर्दी करीत असल्याचे दिसून येते. कोरोनाचे संकट कायम असल्याने नागरिकांनी त्रीसुत्रीची अंमलबजावणी करावे.
-डाॅ. भावना हाडोळे, तालुका वैद्यकिय अधिकारी, बाळापूर.