अकोला : जिल्हा स्त्री रुग्णालयासमोरील खाद्यपदार्थ विक्रेते व हॉटेल व्यवसायिक घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार करून, त्याचा व्यावसायिक वापर करीत असल्याच्या माहितीवरून पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने मंगळवारी दुपारी छापा टाकला. या ठिकाणावरून सहा जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्हा रुग्णालय परिसरातील हॉटेल व्यावसायिक घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर करीत असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी पथकासह सहा ठिकाणी एकाच वेळी छापा टाकून गॅस सिलेंडर, रेगुलेटर व एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या सहा जणांविरुद्ध रामदास पेठ पोलीस ठाण्यात विविध कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने केली.