अकोला : शिक्षणाधिकारी शाहीन सुलताना यांचे निलंबन प्रकरण व शालेय पोषण आहारातील घोळ आदी मुद्यांवर चर्चा करण्यासाठी, शुक्रवारी महापौरांच्या दालनात बोलाविलेल्या बैठकीत, आयुक्त सोमनाथ शेटे यांनी महापौर उज्ज्वला देशमुख यांच्यासोबत चांगलीच बाचाबाची केली. शिक्षणाधिकार्यांचे निलंबन मागे घेण्याच्या फाईलवर नजरचुकीने स्वाक्षरी झाली, तर शालेय पोषण आहाराची प्रक्रिया नियमानुसार पार पडली, असा दावा करीत आगामी दिवसात थकीत देयकं अदा करणारच असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. त्यामुळे शाब्दिक वाद वाढल्यानंतर आयुक्तांनी राजीनामा देण्याचा धमकीवजा इशारा दिला. शिक्षणाधिकारी शाहीन सुलताना यांच्या निलंबनाचा आदेश ३0 जून रोजी जारी करणार्या आयुक्त सोमनाथ शेटे यांनी, ६ जुलै रोजी निलंबन मागे घेण्याचा आदेश जारी केल्याने प्रकरण वादाच्या भोवर्यात सापडले आहे. शालेय पोषण आहार अंतर्गत खिचडीच्या कंत्राट वाटप प्रक्रियेत मोठय़ा प्रमाणात अनियमितता झाली असून, संबंधित अधिकार्यांनी तब्बल ९ लाख रुपयांची ह्यदुकानदारीह्ण केल्याची माहिती आहे. या दोन्ही मुद्यांवर भाजप- शिवसेनेचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी एकवटले असताना प्रशासनाची मुजोरी कायम आहे. नेहमीच्या सवयीप्रमाणे आठवड्यातून दोन दिवस मनपाचे प्रशासकीय कामकाज पाहणारे आयुक्त शुक्रवारी मुंबईकडे रवाना होणार असल्याची कुणकुण पदाधिकार्यांना लागताच, त्यांनी आयुक्त शेटे यांना चर्चेसाठी महापौरांच्या दालनात बोलावले; परंतु अवघ्या पाचच मिनिटात, शिक्षणाधिकारी सुलताना यांचे निलंबन, शालेय पोषण आहारातील घोळ व थकीत देयकांच्या मुद्यावर स्पष्टीकरण देत, आयुक्तांनी काढता पाय घेतला. त्यांनी राजीनामा देण्याचा इशाराही दिला.
आयुक्त महापौरांमध्ये खडाजंगी
By admin | Published: July 11, 2015 1:38 AM