अकोला: महापालिकेत कार्यरत तीन कर्मचारी रमाई घरकुल योजनेचा लाभ घेत असल्याचा छडा खुद्द संबंधित अधिकार्यांनीच लावला. यामध्ये एका सेवानवृत्त कर्मचार्याचादेखील समावेश आहे. या कर्मचार्यांच्या फाइल नामंजूर करण्याचे आदेश संबंधित अधिकार्यांना आठ दिवसांपूर्वीच दिले होते. याप्रकरणी नाहक दिशाभूल केली जात असल्याचे बुधवारी मनपा आयुक्त अजय लहाने यांनी स्पष्ट केले. महापालिकेमार्फत दारिद्रय़रेषेखालील नवबौद्ध घटकातील पात्र लाभार्थींसाठी रमाई आवास घरकुल योजनेंतर्गत हक्काचे घर बांधून दिले जात आहे. बांधकाम विभागाला संबंधित लाभार्थींची यादी सुवर्ण जयंती नगरोत्थान विभागाकडून प्राप्त होते. अर्थातच, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता असल्याशिवाय सुवर्ण जयंती विभागाकडून यादी पाठवली जात नाही. बांधकाम विभागाकडून संबंधित फाइलची शहानिशा केल्यानंतर वित्त विभागाकडे पाठविल्या जाते. रमाई घरकुलच्या पात्र लाभार्थींंमध्ये मनपात कार्यरत तीन तर एका सेवानवृत्त अशा चार कर्मचार्यांचा समावेश असल्याची बाब लेखा विभागातील कर्मचार्यांच्या निदर्शनास आली. हा प्रकार बांधकाम विभागाच्या समोर येताच संबंधित प्रकरण तत्काळ आयुक्त अजय लहाने यांच्या समक्ष ठेवण्यात आले. त्यावर फाइल नामंजूर करण्याचे आदेश आयुक्त लहाने यांनी आठ दिवसांपूर्वीच संबंधित अधिकार्यांना दिले होते. अशा लाभार्थींना मनपा अधिकार्यांनीच हुडकून काढले असताना या प्रकरणाचा नाहक बाऊ करून प्रशासनाप्रती संभ्रम निर्माण केला जात असल्याचा मुद्दा प्रशासनाने उपस्थित केला.
आयुक्त म्हणतात, हा तर दिशाभूल करण्याचा प्रयत्न!
By admin | Published: October 08, 2015 1:43 AM