महापालिका क्षेत्रातील विकास कामांसाठी राज्य शासनाकडून दरवर्षी सुवर्ण जयंती नगराेत्थान याेजना, दलितेतर निधी तसेच नागरी दलित वस्ती सुधार याेजनेंतर्गत किमान २० काेटी रुपयांचा निधी प्राप्त हाेताे. यामध्ये आर्थिक हिस्सा मनपा प्रशासनाला जमा करावा लागताे. प्राप्त निधीतून रस्ते, नाल्या, धापे, पेव्हर ब्लाॅक, सामाजिक सभागृह, उद्यानांचे साैंदर्यीकरण, पथदिव्यांसाठी खांबाची उभारणी करणे आदी विकास कामांचा समावेश आहे. यंदाही मनपाला प्राप्त निधीतून सर्वपक्षीय नगरसेवकांनी विकास कामे प्रस्तावित केली आहेत. परंतु अनेकदा आवश्यकता नसताना केवळ स्थानिक रहिवाशांच्या समाधानासाठी नगरसेवक रस्ते, नाल्यांची कामे प्रस्तावित करतात. ही बाब सर्वश्रुत असल्यामुळेच अशा कामांना बाजूला सारण्याच्या उद्देशातून मनपा आयुक्त निमा अराेरा यांनी विविध प्रभागातील प्रस्तावित विकास कामांची पाहणी करण्याचा धडाका लावला आहे. आयुक्तांच्या या भूमिकेमुळे काही नगरसेवकांची काेंडी तर काही नगरसेवकांची कामे तातडीने निकाली निघत असल्याचे चित्र आहे.
सांडपाण्याची समस्या मार्गी
जुने शहरातील प्रभाग क्रमांक १० मध्ये रस्त्यांत पावसाचे पाणी तुंबत असल्याची बाब माजी उपमहापाैर वैशाली शेळके यांनी आयुक्त अराेरा यांच्या निदर्शनास आणून दिली. त्या ठिकाणी नवीन रस्ता प्रस्तावित केल्यास ही समस्या निकाली निघू शकते, ही बाब आयुक्तांना समजताच त्यांनी प्रस्ताव मंजूर केला.
बाराभाई गणपती रस्त्याचे काम कधी?
शहरातील गणेशाेत्सवाला प्रदीर्घ परंपरा लाभली आहे. प्रभाग १० मधील मानाचा बाराभाई गणपती मंदिरासमाेरील रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झाली आहे. हा रस्ता गणेश उत्सवापूर्वी तयार केल्यास भाविक भक्तांना माेठा दिलासा मिळेल,अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका मंजूषा शेळके यांनी आयुक्तांकडे केली आहे. मानाच्या गणपती मंदिरासमाेर रस्ता आयुक्तांनी निकाली काढावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.