अकोला: सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेच्या ठरावावरून उठलेले वादळ शमण्याचे चिन्ह आहे. नगरोत्थानच्या ७ कोटी २0 लाखाच्या ठरावावर महापालिका आयुक्त अजय लहाने निर्णय घेत नसल्यामुळे नगरसेवकांची घुसमट झाली होती. ही कोंडी फोडण्यासाठी महापौर उज्ज्वला देशमुख, स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी पुढाकार घेत गुरुवारी सर्वपक्षीय नगरसेवकांसह आयुक्तांची भेट घेतली. चर्चेदरम्यान नगरोत्थानच्या ठरावाला आयुक्तांनी हिरवी झेंडी दर्शवल्याची माहिती आहे. सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेसाठी प्राप्त झालेला निधी व सत्ताधारी भाजप-शिवसेनेने मंजूर केलेल्या प्रस्तावावरून महापालिकेत सत्ताधारी व प्रशासनात चांगलेच बिनसले. पंतप्रधान आवास योजनेसाठी प्रशासकीय मंजुरी असो वा जीआयएसप्रणालीद्वारे मालमत्तांचे पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया, या दोन्ही विषयांपासून सत्तापक्ष व प्रशासनात वादाला सुरुवात झाली. नियमांवर बोट ठेवणार्या आयुक्त अजय लहाने यांनी सत्ताधार्यांनी मंजूर केलेल्या नगरोत्थानच्या प्रस्तावावरून कोंडीत पकडले. प्रशासनाची भूमिका पाहून सत्ताधार्यांनी ११ कोटी २0 लाख रुपयांचा मंजूर केलेला प्रस्ताव रद्द करीत ४ मे रोजीच्या सर्वसाधारण सभेत पुन्हा नगरोत्थानच्या निधीत नियमानुसार दीडपट वाढ करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. यावेळी ७ कोटी २0 लाख रुपयांचा ठराव प्रशासनाकडे सादर करण्यात आला. ठराव प्रशासनाच्या दाव्यानुसार नियमात नसेल तर आयुक्तांनी शासनाकडे विखंडित करण्यासाठी पाठवणे अपेक्षित होते. तसे न होता हा ठराव आयुक्तांकडे मंजुरीसाठी पडून होता. मध्यंतरी नगरोत्थानचा ठराव मंजूर करावा,यासाठी शिवसेनेच्या उपमहापौरांसह नगरसेवकांनी आयुक्तांची भेट घेतली होती. नगरोत्थानच्या निधीतून सर्वपक्षीय नगरसेवकांच्या प्रभागात कामे होणार आहेत. हा ठराव रखडल्याने नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर होता. अखेर ही कोंडी फोडून आयुक्तांसोबत संवाद साधण्यासाठी महापौर उज्ज्वला देशमुख, सभापती विजय अग्रवाल यांनी पुढाकार घेतला. आयुक्तांसोबत स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल, उपमहापौर विनोद मापारी, सभागृहनेत्या गीतांजली शेगोकार, माजी महापौर सुमनताई गावंडे, हरीषभाई आलीमचंदानी, आशीष पवित्रकार, योगेश गोतमारे, बाळ टाले, सतीश ढगे, राजेश्वरी अम्मा, गोपी ठाकरे, काँग्रेसचे दिलीप देशमुख, अफसर कुरेशी, मनसेचे नगरसेवक राजेश काळे यांनी चर्चा केली.
नगरोत्थानच्या ठरावाला आयुक्तांची हिरवी झेंडी
By admin | Published: June 17, 2016 2:44 AM