अकोला, दि. २३- नव्यानेच आलेल्या ह्यडीसी रुलह्णचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी बिल्डर, इंजिनिअर, मनपा अधिकारी अशा तज्ज्ञ सदस्यांची एक समिती गठित करण्यात येणार आहे. ही घोषणा गुरुवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या बैठकीत करण्यात आली. ऑटो डीसी रुल ची मंजुरी मिळत नाही, तोपर्यंंत कोणतेही नवीन किंवा जुने बांधकाम आणि खरेदी-विक्रीचे व्यवहार करण्यात येऊ नये, असा इशाराही या बैठकीत उपस्थित असलेल्या अकोल्यातील शेकडो बिल्डर्सना देण्यात आला. दरम्यान येत्या दोन महिन्यांत ही समिती कार्यरत होईल, तोपर्यंंत बांधकामांवरील कारवाईला ब्रेक लावण्यात आला आहे.महापौर विजय अग्रवाल, आयुक्त अजय लहाने, नगररचना विभागाचे सहायक संचालक जी. एम. आगरकर, उपमहापौर वैशाली शेळके आणि नगररचनाकार दांदळे यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. अशोक वाटिका चौकातील गणपती प्लाझा या इमारतीवर महापालिकेने बुधवारी गजराज चालविला. अशी कारवाई करण्याआधी त्यांना संधी द्या म्हणून महापौर अग्रवाल यांनी पुढाकार घेऊन मनपा आयुक्त लहाने यांच्यासोबत चर्चा केली. अकोला शहरात अनधिकृत बांधकाम झालेल्या बिल्डर्स आणि रहिवासी लोकांना संधी देऊन बांधकाम तोडण्याचे सांगितले गेले पाहिजे, असा आग्रह महापौरांनी धरला. त्यास सभागृहाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आयुक्तांनीदेखील सहकार्याची भूमिका घेतली. यावेळी बोलताना महापौर विजय अग्रवाल यांनी पुणे, नागपूर, पिंपरी चिंचवड आणि नांदेड महानगरपालिकांच्या धर्तीवर जेवढा ह्यएफएसआयह्ण दिला जाऊ शकतो, तेवढा अकोल्यात दिला गेला पाहिजे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपली चर्चा झाली असल्याचे सांगीतले. शहरातील कारवाईसाठी निवडलेल्या १८६ इमारतींमध्ये खासगी निवासस्थान असणार्यांची संख्या जास्त आहे. नियमच लावायचा तर महापालिका कार्यालय आणि आयुक्ताचे कक्षही नियमात नाही, त्यामुळे नियमात जेवढे बसविता येईल, तेवढे आयुक्तांनी करावे. सर्वच बिल्डर चोर नाहीत. अनेकांनी कर्ज काढून व्यवसाय सुरू केला असल्याने आणखी एक संधी देण्यात यावी अशी सूचना केली. मनपा आयुक्त अजय लहाने यांनी सांगीतले की, बिल्डर आणि बांधकाम व्यावसायिकांसोबत आमचे मनपा अधिकारी, कर्मचारीही जबाबदार आहेत. आता नियमाने चालण्याशिवाय पर्याय नाही. तसे झाले नाही, तर बिल्डरसह मनपाच्या कर्मचार्यांवर फौजदारी दाखल करण्यात येईल, मार्गाच्या लांबीनुसार, क्रीडा मैदानानुसार, नवीन डीसी रुलचे पालन करण्यासाठी आणि त्यानुसार टीडीआर देण्यासाठी महापालिकेचा विशेष सेल कार्यरत राहील. यासाठी तज्ज्ञ अधिकारी असेल, बिल्डर्स यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही लहाने यांनी केले. या बैठकीला अँड. मोतीसिंह मोहता, अँड. सुभाष ठाकूर, क्रेडाईचे उपाध्यक्ष पंकज कोठारी, भाजपचे महानगर अध्यक्ष किशोर मांगटे पाटील, दिलीप चौधरी, जितेंद्र पातूरकर, अमरीश पारेख, पुरुषोत्तम मालाणी, सुशील खोवाल, सुनील हातेकर, बाविसकर, सुफ्फाभाई यांच्यासह शेकडो बिल्डर, बांधकाम व्यावसायिक, इंजिनिअर, मनपा अधिकारी उपस्थित होते.
‘डीसी रुल’च्या काटेकोर अंमलबजावणीसाठी समिती !
By admin | Published: March 24, 2017 2:05 AM