अकोला, दि. ३ - बाजार समितीमध्ये मंगळवारपासून शेतकर्यांनी थेट खरेदीदारांना शेतमाल विकण्याची पद्धत सुरू झाली. अशा विक्रीसाठी मंगळवारी शेतकर्याला आपला माल नगदी पैसे मिळत नसल्याने परत न्यावा लागला. त्यानंतर बुधवारी दुसर्या दिवशी पुन्हा एका शेतकर्याला कमी भाव मिळाल्याच्या कारणावरून आपली तूर परत न्यावी लागली आहे.बाश्रीटाकळी तालुक्यातील पाटखेड येथील एका शेतकर्याने बुधवारी आपली पाच कट्टे तूर विक्रीसाठी आणली; परंतु या शेतकर्याच्या तुरीला केवळ ७५५0 रुपयेप्रति क्विंटलचा भाव मिळाल्याने शेतकर्याने आपली तूर विकण्यास नकार दिला. त्यानंतर काही शेतकर्यांनी एकत्र येऊन बाजार समितीच्या कार्यालयात जाऊन जाब विचारीत सुरू असलेल्या या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. प्राप्त माहितीनुसार या शेतकर्याला आपला शेतमाल परत नेण्यासाठी वाहन भाडे देण्यात आल्याचे समजले. या सगळ्या प्रकाराबाबत सचिवांशी संपर्क साधण्याचा अनेक वेळा प्रयत्न केल्यानंतरही त्यांनी उत्तर दिले नाही. जेव्हा अकोल्याच्या बाजारपेठेत शेतकर्याच्या तुरीला ७५५0 रुपयांचा भाव निश्चित झाला, तेव्हा याच दिवशी दुसरीकडे खामगावच्या बाजारपेठेत ७९५0 रुपयांपर्यंंत भाव मिळाल्याचे समजते. तेही खरेदीदाराने २ टक्के अडत देऊन हा भाव दिला आहे. अडत्याच्या मध्यस्थीशिवाय सरळ खरेदीदाराला शेतमाल विकण्यामागे शेतकर्याला तेवढा जास्त भाव मिळावा हा उद्देश आहे; परंतु या उद्देशालाच हरताळ फासल्या जात असल्याचे यावरून दिसून येते.
बाजार समितीतून दुस-या दिवशीही शेतमाल परत गेला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2016 1:38 AM