राजरत्न सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : हमीपेक्षा कमी दराने मूग, उडिदाची खरेदी सुरू आहे. शेतकर्यांचे हे होणारे नुकसान टाळण्यासाठी येत्या ३ ऑक्टोबर रोजी राज्यात शासकीय मूग खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. तसेच एक लाख टन सोयाबीन खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारच बाजारात उतरणार असल्याचे वृत्त आहे.यावर्षी मुगाचा काढणी हंगाम सुरू होऊन एक महिना होत आला, तरी अद्याप शासकीय मूग खरेदी राज्यात सुरू झाली नाही. सणासुदीचे दिवस असल्याने शेतकर्यांना मूग विकावा लागत आहे. केंद्र शासनाने मुगाचे हमीदर प्रतिक्विंटल ५ हजार ३७५ रुपये जाहीर केले असून, प्रतिक्विंटल २00 रुपये बोनसही देण्यात येणार आहे. म्हणजे शासनाने मूग खरेदी केल्यास शेतकर्यांना प्रतिक्विंटल ५ हजार ५७५ रुपये दर मिळणार आहेत. पण, बाजारात सध्या ४ हजार ५८0 रुपये प्रतिक्विंटल दराने मूग खरेदी केली जात आहे.म्हणजेच एक हजार रुपयाने शेतकर्यांची लूट सुरू आहे. सोयाबीनचे हमीदर २ हजार ८५0 रुपये आहेत. २00 रुपये बोनस मिळून शेतकर्यांना ३ हजार ५0 रुपये प्रतिक्विंटल मिळणार आहेत. पण, बाजारात सध्या सरासरी २,७00 रुपये दराने सोयाबीनची खरेदी केली जात आहे. प्रतवारीनुसार हे दर कमी जास्त होत आहेत. मागच्या वर्षी सोयाबीन खरेदीत शेतकर्यांची प्रचंड लूट झाली. १ हजार ८00 ते २ हजार रुपये प्रतिक्विंटल दराने शेतकर्यांकडून सोयाबीनची खरेदी करण्यात आली. यावर्षी राज्यात ३७ लाखावर सोयाबीनचा पेरा झाला आहे. विदर्भात हे क्षेत्र १७ लाख हेक्टरवर आहे. विदर्भात सुरुवातीला पाऊस लांबल्याने या पिकावर त्याचे प्रतिकूल परिणाम झाले आहेत. या सर्व पृष्ठभूमीवर केंद्र शासनाने यावर्षी हमी दराने एक लाख टन सोयाबीन खेरदीचा निर्णय घेतला आहे. सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू होत असल्याने लवकरच सोयाबीन खरेदी केली जाणार आहे.
सरकार स्वस्थ बसलेले नाही, अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. तूर, मूग, उडीद आयातीवर नियंत्रण आणले. २00६ पासूनची निर्यात बंदी उठवली. खाद्य तेलावर १0 टक्के आयात शुल्क वाढवले, वाटले सोयाबीनचे दर वाढतील, पण एवढे सर्व करू नही हमीदर मिळत नसतील, तर शासनालाच बाजारात उतरावे लागणार असून, तसा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. राज्यातील एक लाख टन सोयाबीन खरेदी केले जाणार आहे. - पाशा पटेल, अध्यक्ष, राज्य कृषी मूल्य आयोग.-