अकोला : घरी गडगंज संपत्ती... ना कशाची उणीव, ना दुखाचा लवलेश... सुखवस्तू कुटुंबात लहानाची मोठी होऊन नेत्रतज्ज्ञ म्हणून नावलौकिक मिळवल्यानंतर आपण ज्या शहरात राहतो, तेथील गोरगरीब, निराधारांना मदतीचा हात देण्याची आत्मिक तळमळ लागून राहिलेल्या येथील डॉ. पूजा सुमित्रा रमाकांत खेतान यांनी गत तीन महिन्यांपासून सुमिरमा फाऊंडेशनच्या माध्यमातून सेवेचे व्रत स्वीकारले आहे. डॉ. पूजा खेतान या धर्मादाय पद्धतीने सुरू असलेल्या दम्माणी नेत्र रुग्णालयात सेवा देत असून, दिवसभर रुग्णालयात कर्तव्य केल्यानंतर सायंकाळी घराबाहेर पडून शहरातील रस्त्यांच्या कडेला असलेल्या निराधारांची सेवा करतात. गत तीन महिन्यांपासून त्यांचा हा उपक्रम सुरू आहे. या उपक्रमाअंतर्गत डॉ. पूजा खेतान व त्यांचे सहकारी शहरातील १२ ते १३ ठिकाणी दररोज भेट देऊन तेथे वास्तव्य करणाऱ्या निराधारांना चहा, नाष्टा व जेवण देतात. दररोज ३०० लोकांना जेवण व चहा पुरविला जातो. एवढेच नव्हे, तर कोरोनाकाळात डॉ. पूजा खेतान यांनी स्वत: निराधारांची सेवा केली. डॉ. पूजा खेतान या स्वत:च्या पैशांतून रुग्णांना चष्मे व औषधोपचार करतात. अकोट फैलस्थित बेघर निवारा येथेही डॉ. पूजा खेतान भेट देऊन तेथील निराधारांची सेवा करतात.
या कामात त्यांना इश्वर जैन, आशिष खिल्लारे, आकाश सोनोने, सागर शिंदे, रवी भगत, अर्जुन सोनी यांचे सहकार्य लाभत आहे.
निराधाला उभारून दिला निवारा
शिवाजी महाविद्यालयाजवळ गत अनेक महिन्यांपासून एक निराधार वृद्ध उघड्यावर राहात आहे. डॉ. पूजा खेतान यांना या वृद्धाबाबत समजताच त्यांनी स्वत: या वृद्धाची सुश्रुषा केली. विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या या वृद्धाला उपचार मिळवून देण्यात त्यांनी मदत केली. एवढेच नव्हे, तर त्याला अस्थायी निवाराही उभारून दिला आहे.
शहरातील निराधारांची स्थिती पाहून माझा जीव कासावीस झाला. यांच्यासाठी काहीतरी करण्याच्या उद्देशाने गत तीन महिन्यांपासून त्यांना मदतीचा हात देत आहे.
आपल्या शहरात निराधारांची संख्या जास्त नाही. सर्वांनी मिळून या निराधारांची जबाबदारी उचलली तर कुणीही उघड्यावर राहणार नाही.
डॉ. पूजा सुमित्रा रमाकांत खेतान, अकोला.