अकोला : अवकाळी पावसासह गारपिटीच्या तडाख्यात हाताशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने, शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनामार्फत मदत जाहीर करण्यात आली; मात्र पीक नुकसानाच्या तुलनेत मिळणारी मदत अत्यंत तोकडी असल्याच्या प्रतिक्रिया शेतकºयांमध्ये उमटत आहेत.गत ११ फेबु्रवारी रोजी जिल्ह्यातील सातही तालुक्यांत अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसला. अवकाळी पाऊस व गारपिटीने विविध गावांत हरभरा, गहू या रब्बी पिकांसह संत्रा, लिंबू, केळी ही फळपिके आणि कांदा व भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले. कापणीला आलेल्या व कापणी झालेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला. विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसासह गारपिटीने पिकांचे नुकसान झाल्याने, हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनामार्फत गत १४ फेबु्रवारीला मदत जाहीर करण्यात आली. त्यानुसार जिरायती क्षेत्रातील पीक नुकसान भरपाईपोटी प्रती हेक्टरी ६ हजार ८०० रुपये आणि बागायती क्षेत्रातील नुकसान भरपाईपोटी प्रती हेक्टरी १३ हजार ५०० रुपये, अशी मदत दोन हेक्टर मर्यादेपर्यंत गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार आहे. जिरायती क्षेत्रातील हरभरा व गहू या पिकांच्या पेरणी, बियाणे, खते, फवारणी व काढणीसाठी हेक्टरी १५ हजार रुपये शेतकºयांना खर्च करावा लागला. त्यामुळे अवकाळी पाऊस आणि गारपिटीने पिकांचे झालेले प्रचंड नुकसान आणि त्या तुलनेत शासनामार्फत जाहीर करण्यात आलेली हेक्टरी मदत लक्षात घेता, पीक नुकसानाच्या तुलनेत मदत अत्यंत तोकडी असल्याचा सूर गारपीटग्रस्त शेतकऱ्यां मध्ये उमटत आहे.जिरायती क्षेत्रात रब्बी हंगामातील हरभरा, गहू पिकांच्या पेरणीसाठी हेक्टरी १५ हजार रुपये खर्च करावा लागला. त्या तुलनेत अवकाळी पाऊस व गारपिटीने पीक नुकसान भरपाईपोटी शासनामार्फत जाहीर करण्यात आलेली हेक्टरी ६ हजार ८०० रुपयांची मदत अत्यंत तोकडी आहे. त्यामुळे ही मदत नसून, शेतकºयांची थट्टा आहे.-शिवाजीराव भरणे, शेतकरी, रामगाव.