लोकमत न्यूज नेटवर्क
अकाेला : ‘ओबीसी’ प्रवर्गातील जिल्हा परिषदेचे १४ सदस्य व सहा पंचायत समित्यांच्या २४ सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. निवडणूक आयोगाने सदस्यत्व रद्द झालेल्या जागांवर पुन्हा निवडणुका घेण्यात येतील, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे संभाव्य निवडणुकीची सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली असून, राज्यातील सत्ता समीकरणांमुळे महाविकास आघाडीचे एकत्रित आव्हान भाजप व वंचित बहुजन आघाडीसमाेर राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील घटक पक्ष आघाडीसाठी अनुकूल असले, तरी सध्या सर्वच पक्षांनी स्वबळाची तयारी सुरू केल्याचे चित्र आहे.
जिल्हा परिषदेच्या २०२०मध्ये झालेल्या निवडणुकीत काही सदस्य अतिशय अटीतटीच्या फरकाने निवडून आले आहेत. जिल्हा परिषदेतील ५३ जागांपैकी २२ जागा जिंकून वंचित बहुजन आघाडीने सत्ता स्थापन केली हाेती. आता ‘ओबीसी’ प्रवर्गातील १४ सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. त्यामध्ये ‘वंचित’चे सर्वाधिक ८ सदस्य आहेत; त्या खालाेखाल भाजपचे ३, शिवसेना राष्ट्रवादी व काॅंग्रेसच्या प्रत्येकी एक अशा सदस्यांना पुन्हा निवडणुकीला समाेरे जावे लागणार आहे. या सर्व जागांवर महाविकास आघाडी झाली तर वंचित व भाजपला माेठे आव्हान उभे राहू शकते, त्यामुळे सध्या सर्वच जिल्हाध्यक्ष महाविकास आघाडीसाठी अनुकूल आहेत.
महाविकास आघाडीबाबत पक्षाच्या नेत्यांशी संवाद सुरू आहे. आघाडीसाठी आम्ही अनुकूल आहाेत त्यामुळे आगामी काळात बैठक घेऊन चर्चा केली जाईल. ही चर्चा सकारात्मक झाली तर महाविकास आघाडीचा जन्म हाेऊ शकेल. अन्यथा आम्ही आमची तयारी सुरू केली आहे.
नितीन देशमुख, आमदार तथा जिल्हाप्रमुख, शिवसेना
महाविकास आघाडीबाबत सकारात्मक आहाेत. अजून तरी अधिकृत बैठक घेतलेली नाही. निवडणुका जाहीर झाल्यानंतर याबाबत सर्वच पक्षांच्या नेत्यांशी बाेलून ठरवता येईल. आम्ही संघटना म्हणून निवडणुकीसाठी तयारच आहाेत, बैठकाही सुरू केल्या आहेत.
संग्राम गावंडे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काॅंग्रेस
शिवसेनेला संधी
शिवसेनेला जिल्हा परिषदेवर झेंडा फडकविण्याचे ध्येय साध्य करता आले नसले तरी दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून सेनेची ताकद अधाेरेखित झाली आहे. सदस्यत्व रद्द झालेल्या १४ जागांमध्ये सेनेची केवळ एक जागा कमी झाली आहे, त्यामुळे सेनेला मुसंडी मारण्याची संधी आहे. त्यामुळे शिवसेनेने मंडलनिहाय बैठका सुरू केल्या असून, स्वबळाची तयारी ठेवली आहे. राज्यातील सत्ता अन् जिल्हा परिषदेतील वंचितच्या सत्तेची एन्टी इन्कम्बन्सी याचा फायदा शिवसेना कशी उठवते, त्यावरच पुढचे सत्ताकारण ठरणार आहे.
वंचितच्या मंडलनिहाय बैठका
वंचित बहुजन आघाडीकडून आगामी निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. पक्षाच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसह जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचे पदाधिकारी व सदस्यांची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये वंचितची सत्ता कायम ठेवण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नवनिर्वाचित उपाध्यक्ष डाॅ. धैर्यवर्धन पुंडकर यांच्या उपस्थितीत मंडलनिहाय मेळाव्यांचे आयाेजन करण्यात आले असून, वंचितही आपली संख्या वाढविण्याच्या दृष्टीने तयारीला लागली आहे.