अकोला: विधानसभेच्या जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघासाठी कॉँग्रेसमधील दिग्गजांमध्ये स्पर्धा वाढत असल्याचे मुलाखतीसाठीच्या अर्जावर नजर टाकल्यास दिसून येते. आता तर उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी मनपातील पदाधिकार्यांनीही हालचाली सुरू केल्या आहेत. शनिवारपर्यंत एकूण ७२ अर्ज कॉँग्रेस कार्यालयातून वितरित करण्यात आले. ऑगस्ट महिन्याच्या तिसर्या किंवा चौथ्या आठवड्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच पक्षातील इच्छुकांनी उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. जिल्ह्यातील अकोला पूर्व, अकोला पश्चिम, मूर्तिजापूर, बाळापूर आणि आकोट या पाचही मतदारसंघांमधील इच्छुक उमेदवारांनी अर्ज घेतले आहेत. अर्ज घेणार्यांमध्ये माजी आमदार, माजी मंत्री, पक्षाचे पदाधिकारी आणि नगरसेवकांनंतर आता महापालिकेतील पदाधिकार्यांचाही समावेश आहे. अकोला पश्चिम मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी आणखी काही नगरसेवकांनी दावा केला आहे. या मतदारसंघात मुस्लिम आणि मराठा समाजातील मते निर्णायक आहेत. त्यामुळे दोन्ही समाजातील पक्षातील दिग्गज नेते उमेदवारीसाठी दावेदारी करीत आहेत.
कॉँग्रेसमधील उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी दिग्गजांमध्ये स्पर्धा
By admin | Published: August 10, 2014 1:41 AM