अकोला : सहकारी संस्था तालुका उपनिबंधकाने बैदपुर्यातील अवैध सावकाराविरुद्ध शुक्रवारी सायंकाळी कोतवाली पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार केली. या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी उशिरा रात्रीपर्यंत या अवैध सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल केला नव्हता. सहकारी संस्था तालुका उपनिबंधकांनी दिलेल्या तक्रारीवरून बैदपुर्यातील नालसाहेब चौकात राहणारा जाकीर खान साहेब खान याच्या घराची झडती घेतली असता, त्याच्या घरामध्ये अवैध सावकारीबाबतचे शेकडो दस्तऐवज मिळून आल्याने तो अवैध सावकारी व्यवसाय करीत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जाकीर खान याच्यावर महाराष्ट्र सावकारी (नियमन) अध्यादेश २0१४ चे कलम १६ व १७ नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, असे तक्रारीत म्हटले आहे; परंतु कोतवाली पोलिसांनी शुक्रवारी उशिरा रात्रीपर्यंत गुन्हा दाखल केलेला नव्हता. यापूर्वी अकोला शहरात अवैध सावकारीमध्ये गुंतलेल्या एका बड्या आसामीविरुद्ध पोलिसांनी अशाचप्रकारे कारवाई केली होती. त्यानंतरची ही दुसरी कारवाई आहे.
उपनिबंधकाची अवैध सावकाराविरुद्ध पोलिसांत तक्रार
By admin | Published: January 31, 2015 12:40 AM