अकोला - शहरातील एका प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञाविरुद्ध एका महिलेवर चुकीचा उपचार केल्याची तक्रार सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.राजनखेड येथील महिलेने सिव्हिल लाइन्स पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, तिच्या १७ वर्षीय मुलीला गत महिन्यात उलट्या व ताप डोक्यामध्ये गेल्याने ती बडबड करीत होती. त्यामुळे स्थानिक लोकांच्या सल्ल्याने तिला मनोरुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तिला न तपासता, अप्रशिक्षित व्यक्तीने या मुलीची तपासणी केल्याचे मुलीच्या आईचे म्हणणे आहे. त्यानंतर समुपदेशनासाठी दुसऱ्याकडे पाठवले असता, समुपदेशन सुरू असतानाच तेथील अनोळखी व्यक्तीने जो अप्रशिक्षित आहे, त्याने या मुलीला ईटीसी शॉक देण्याबाबत सुचविले. त्यानंतर डॉक्टरांनी मुलीला भरती करून घेतले व पाच शॉक द्यावे लागतील, असे सांगून मुलीला नर्सींगचा कोर्सही न केलेल्या व्यक्तीच्या ताब्यात सोपवून डॉक्टर नाशिकला निघून गेले. त्यानंतर मानसोपचारतज्ज्ञ उपस्थित नसताना मुलीला दोनदा शॉक दिले व तिला ओव्हरडोस औषधे देऊन दिवसभर बेशुद्ध ठेवल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. यासोबतच या रुग्णालयाचा परवानाही संशयास्पद असून, त्याची तपासणी करण्याची मागणी या महिलेने केली आहे. ही तक्रार सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात देण्यात आली असून, पोलिसांनी ही तक्रार चौकशीत ठेवली आहे.