लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी राज्याचे ऊर्जा व उत्पादन शुल्क मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी शनिवारी येथे घेतलेल्या ‘जनता दरबारात’ वीज ग्राहकांच्या सर्व तक्रारींचा फैसला ‘आॅन द स्पॉट’ केला. जनतेच्या वीजविषयक समस्यांचा निपटारा करताना बावनकुळे यांनी महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर तर धरलेच, शिवाय त्यांच्या अक्षम्य हलगर्जीबद्दल त्यांची कानउघाडणी करून वीज ग्राहकांच्या सर्व समस्या तातडीने निकाली काढण्याचे निर्देशच या जनता दरबारात दिले.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या के.आर. ठाकरे सभागृहात शुक्रवारी दुपारी ११ ते ३ या वेळेत पार पडलेल्या या जनता दरबारात यावेळी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, आमदार हरीश पिंपळे, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार बळीराम सिरस्कार, महापौर विजय अग्रवाल, पाचही नगर परिषदांचे नगराध्यक्ष, भाजप जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि महावितरणचे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. जनता दरबारात बावनकुळे यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. प्रास्ताविकास फाटा देऊन थेट तक्रार अर्ज हाताळण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. जनता दरबाराची घोषणा झाल्यापासून आॅनलाइन व दूरध्वनीवरून आलेल्या तक्रारींचा गोषवारा त्यांनी अधिकाऱ्यांकडे मागितला. त्यानंतर बावनकुळे यांनी प्रत्यक्ष प्राप्त झालेले तक्रार अर्ज निकाली काढण्यास सुरुवात केली. यावेळी जनता दरबारात आलेल्या वीज ग्राहकांनी एक-एक करून तक्रारींचा पाढाच वाचण्यास सुरुवात केली. पैसे भरूनही वीज पुरवठा न मिळणे, शेतातून उच्चदाब वाहिनी गेल्यानंतरही नुकसानभरपाई न मिळणे, वीज बिल वेळेवर न येणे, अवाजवी बिल मिळणे, अधूनमधून वीज पुरवठा खंडित होणे, वेळेवर वीज जोडणी न मिळणे, पायाभूत सुविधा आराखड्यातील कामांचा दर्जा, वीज चोरी आदींबाबत उत्स्फूर्तपणे आपापल्या अडचणी, तक्रारी मांडून त्याकडे ऊर्जा मंत्र्यांचे लक्ष वेधले. दरम्यान, नागरिकांची तक्रार ज्या कुण्या संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांबाबत असेल, त्यांचा ऊर्जा मंत्र्यांनी चांगलाच समाचार घेतला. प्रत्येक तक्रारीचे निवारण करण्यासाठी किती कालावधी लागेल, याची तक्रारकर्त्यासमक्ष विचारणा करून त्यांचे समाधान केले. कर्तव्यात कसूर करणाऱ्या महावितरणच्या चार अधिकाऱ्यांना यावेळी कारणे दाखवा नोटिस बजावण्याचे आदेशही ऊर्जा मंत्री बावनकुळे यांनी मुख्य अभियंता अरविंद भादिकर व नागपूरचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांना दिले. शेतकऱ्यांना दंड व्याज माफजिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून कृषी पंपांची कोट्यवधींची थकबाकी आहे. ही रक्कम भरणे शेतकऱ्यांना जिकिरीचे होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना थकबाकीवरील दंड व व्याज माफ करून त्यांच्याकडून पाच हप्त्यांमध्ये थकबाकी वसूल करण्याच्या सूचना ऊर्जा मंत्र्यांनी केल्या. शेतकऱ्यांकडून वसूल झालेला पैसा शासनाला न पाठविता तो पैसा शेतकऱ्यांना कृषी पंप जोडण्या व इतर कामांसाठी वापरा, असेही बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.बेरोजगार अभियंत्यांना कामे देणार!जिल्ह्यातील बेरोजगार अभियंत्यांना कामे देण्यात यावी. या कामाचे वाटप लॉटरी पद्धतीने करून याकरिता जिल्ह्यातील बेरोजगार अभियंत्यांचे मेळावे घेण्याची सूचना बावनकुळे यांनी केली. या अभियंत्यांना प्रत्येकी १५ लाखांची पाच अशी एकूण ७५ लाखांची कामे देण्यात यावी, यामुळे त्यांना अनुभव प्राप्त होईल, असे बावनकुळे म्हणाले.अभियंत्यांना तासलेजनता दरबारात वीज ग्राहकांनी तक्रारींचा पाढा वाचल्यानंतर ऊर्जामंत्र्यांचा पारा चढला. महावितरणचे अधिकारी काम करीत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी अकोला ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र उंबरकर, शहर विभागाचे कार्यकारी अभियंता धर्मेंद्र मानकर, अकोटचे कार्यकारी अभियंता काकडे यांच्यासह उपकार्यकारी अभियंता सुशील जयस्वाल, सचिन कोहाड, प्रशांत काळे यांच्यासह सहायक अभियंता व कनिष्ठ अभियंत्यांची कानउघाडणी केली. यापैकी तीन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसही बजावण्यात आल्या.मुख्यमंत्री सौर वाहिनीजिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवसाला १२ तास अखंड वीज पुरवठा मिळावा, यासाठी मुख्यमंत्री सौर वाहिनी योजनेंतर्गत लवकरच ८०० ते १००० शेतकऱ्यांच्या गटाला ‘पीपीपी’ तत्त्वावर सौर प्रकल्पाद्वारे विद्युत पुरवठा उपलब्ध करून देणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.कामचुकारांची आता खैर नाही!महावितरणचे अधिकारी, कर्मचारी सरकारकडून पगार घेतात. ते जनतेचे सेवक आहेत. वीज ग्राहकांना सेवा देण्यात व कर्तव्यात कसूर करणाऱ्यांची खैर केली जाणार नाही, असा इशारा बावनकुळे यांनी दिला. अनेक कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत. अनेक अभियंत्यांची कंत्राटदारांशी सलगी आहे. लाइनमनपासून ते अभियंत्यापर्यंत सर्वांची खडान्खडा माहिती आहे. मी आंधळा ऊर्जामंत्री नाही. कामचुकारपणा करणाऱ्यांना गडचिरोलीला पाठवेल, असा इशारा बावनकुळे यांनी दिला.२५ हजारांत देणार सौरपंपसौर ऊर्जेवरील कृषी पंपांना चालना देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. अकोल्यात ५०० सौर पंप वाटण्याचा सरकारचा इरादा असून, यासाठी सर्व आमदारांना कोटा वाटून देण्यात आला आहे. लाभार्थीने २५ हजार हिस्सा भरल्यास शासनाकडून ३ लाख ७५ हजारांचे अनुदान देण्यात येईल. दहा एकरपर्यंत जमीन असलेल्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे बावनकुळे यांनी सांगितले.३० जूनला पुन्हा घेणार जनता दरबार!अकोल्यात ३० जून रोजी पुन्हा जनता दरबार घेण्यात येईल. आजच्या दरबारात सुनावणी झालेल्या तक्रारींचा निपटारा काढण्यासाठी अधिकाऱ्यांनी ठरावीक कालावधी दिला आहे. या कालावधीत समस्यांची सोडवणूक झाली नाही, तर आपल्या ९०४९४४४४४४ या मोबाइल क्रमांकावर एसएसएम किंवा व्हॉट्सअॅपद्वारे तक्रार करण्याचे आवाहन बावनकुळे यांनी केले. तुफान फटकेबाजी अन् हास्यकल्लोळजनता दरबारात लोकांच्या तक्रारींचा निपटारा करताना ऊर्जा मंत्री बावनकुळे यांनी चौफेर फटकेबाजी केली. आपल्याशी उद्दाम वर्तन करणाऱ्या अधिकाऱ्यांना ऊर्जा मंत्र्यांकडून दिल्या गेलेल्या कानपिचक्या व मारलेल्या कोपरखळ्या ऐकून सभागृहात उपस्थित जनतेमध्ये एकच हशा पिकत होता.
तक्रारींचा फैसला ‘आॅन द स्पॉट!’
By admin | Published: May 20, 2017 1:22 AM