अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये सुरू असलेल्या गलथान कारभाराची चौकशी करण्यासाठी बैठक बोलवावी आणि चौकशी समिती गठित करावी, यासोबतच निंबी मालोकार येथील कृषी तंत्र विद्यालयातील कारभाराची चौकशी करून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्याची मागणी कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य विनायक सरनाईक यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे केली आहे.त्यांच्या तक्रारीमध्ये निंबी मालोकार येथील कृषी तंत्र विद्यालयाची दुरवस्था झाली असून, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कोणत्याच सुविधा उपलब्ध नाहीत. विद्यालयाकडे असलेली ६७ हेक्टरपैकी ३५ हेक्टर जमीन पडीत आहे. चराईसाठी चोवीस एकर जमीन राखीव असताना जनावरे कृश झाली आहेत. त्यांना जखमा झाल्या असून, पिण्याच्या पाण्याचीसुद्धा सोय नाही. कृषी तंत्र विद्यालयावर विद्यापीठाचे नियंत्रण नसल्यामुळे प्राचार्य-प्राध्यापकांमध्ये वाद आहेत. यासोबतच कृषी विद्यापीठाचे यंदा मानांकन घसरले आहे. इमारतीच्या दुरुस्तीसाठी १३.५३ कोटी रुपयांच्या निविदा बोलाविण्यात आल्या. यात अनियमिततेचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे. सुधारित निविदा प्रक्रिया राबविण्याचे कार्यकारी परिषद सदस्यांनी सांगितल्यावरही कोणतीही दखल घेण्यात आली नाही. सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण प्रकल्पावर अनियमित खर्च करण्यात आला आहे. खर्च करताना नियमाचे उल्लंघन करण्यात आले आहे. संशोधनातील खोटी आकडेवारी दाखविण्यात येत असल्याचा गंभीर आरोपही विनायक सरनाईक यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे केलेल्या तक्रारीतून केला आहे. (प्रतिनिधी)
काय आहे तक्रारीत!कृषी विद्यापीठातील वरिष्ठ शास्त्रज्ञ शेतकऱ्यांना चांगली वागणूक न देता, चुकीचा सल्ला देतात. प्रशिक्षणामध्ये खोटी आकडेवारी दाखविण्यात येते. विद्यापीठ मुख्यालयी शेतकऱ्यांना राहणाºया निवास व्यवस्थेची दुरवस्था झाली आहे. विद्यापीठाचे शेतकरी माहिती केंद्र, टोल फ्री क्रमांक फक्त नावापुरतेच आहेत. नियमाप्रमाणे आर.आर.सी.मध्ये कमीत कमी दोन वर्षे झालेल्या प्रयोगांचा अंतर्भाव करणे आवश्यक आहे आणि बोर्ड आॅफ स्टडीमध्ये विद्यार्थ्यांनी एक वर्ष केलेल्या प्रयोगांचा समावेश होतो; परंतु आर.आर.सी.मध्ये विद्यार्थ्यांनी पदवीसाठी केलेल्या अभ्यासाचा समावेश करून संशोधनाची खोटी आकडेवारी फुगवून दाखविण्यात येते. त्यामुळे संशोधनाचा दर्जा खालावला आहे, असे गंभीर आरोप कार्यकारी परिषदेचे सदस्य विनायक सरनाईक यांनी केले आहेत.