राजेश शेगोकार, अकोला : अमरावतीमधील एका बेपत्ता मुलीच्या प्रकरणात खासदार नवनीत राणा यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात गोंधळ घालून ते प्रकरण लव्ह जिहादचे असल्याचा खोटा आरोप करून दोन धर्मियांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप जावेद झकेरिया यांनी करीत, नवनीत राणा यांच्याविरूद्ध १३ सप्टेंबर रोजी दुपारी रामदास पोलीस ठाण्यात केली आहे. पोलिसांनी ही तक्रार चौकशीत ठेवली आहे.
अकोल्यातील सामाजिक कार्यकर्ते जावेद झकेरिया यांच्या तक्रारीनुसार ७ सप्टेंबर रोजी सोशल मीडियावर व्हिडिओसह एक बातमी झळकली होती. त्यामध्ये खासदार नवनीत राणा पोलीस अधिकाऱ्यांसोबत वाद घालून एका बेपत्ता मुलीच्या प्रकरणाचा आधार घेत, हे प्रकरण लव्ह जिहादचे असल्याचा आरोप करीत होत्या. दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने भिन्न धर्मिय युवकाने लव्ह जिहाद अंतर्गत मुलीला पळवून नेल्याचा आरोत त्यांनी केला. हिंदू मुली मुस्लीम मुलांसोबत पळून गेल्याच्या खोट्या बातम्या खासदार राणा पसरवून राजकीय फायद्यासाठी दोन धर्मातील लोकांना भडकावित असल्याचा आरोप जावेद झकारिया यांनी तक्रारीतून केला.
खासदार राणा यांनी हे कृत्य दोन धर्म आणि समुदायांमध्ये दंगल घडविण्याच्या उद्देशाने केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याजी मागणी जावेद झकेरिया यांनी केली आहे.