अकाेला : सर्वसामान्य अकाेलेकरांच्या समस्या जाणून घेण्यासाठी महापालिका आयुक्त निमा अराेरा यांनी आठवड्यातून दाेन दिवस नागरिकांसाेबत संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे. त्याआनुषंगाने साेमवार आणि शुक्रवारी सायंकाळी ४ ते ६ ही वेळ निश्चित केली. शुक्रवारी पहिल्याच दिवशी नागरिकांनी आयुक्तांकडे धाव घेत तक्रारींच्या निराकरणाची मागणी केली आहे. सर्वसामान्य नागरिकांना मूलभूत सुविधांची पूर्तता करणे ही महापालिकेची नैतिक जबाबदारी आहे. स्वच्छ व प्रशस्त रस्ते, पथदिवे, पदपाथ व पाणीपुरवठ्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाेबतच नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करणेदेखील प्रशासनाचे कर्तव्य आहे. सद्य:स्थितीत शहरात मूलभूत सुविधांची दाणादान उडाली असून, नागरिकांच्या समस्यांची प्रशासनाकडून गंभीरपणे दखल घेतली जात नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यामुळे नागरिकांचा महापालिका प्रशासन व सर्वपक्षीय नगरसेवकांप्रती असलेला विश्वास कमी झाल्याची खंत व्यक्त केली जात आहे. अशास्थितीत महापालिका आयुक्त निमा अराेरा यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या निकाली काढण्याच्या उद्देशातून दर साेमवारी व शुक्रवारी सायंकाळी ४ ते सहा या कालावधीत अकाेलेकरांसाेबत संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या दिवशी आयुक्तांकडे २२पेक्षा अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
स्वागत करणाऱ्यांच्या गर्दीने संभ्रम
आयुक्त निमा अराेरा यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी वेळ निश्चित केला. या कालावधीत त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करणाऱ्यांचीच गर्दी वाढल्यामुळे याठिकाणी काहीकाळ संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले हाेते.
अनधिकृत बांधकामाच्या तक्रारी
शेजाऱ्याने घराचे अनधिकृत बांधकाम केले. त्यामुळे विविध समस्या निर्माण झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. प्रभागात रस्ते व नाल्यांची साफसफाई हाेत नसल्याने वयाेवृद्ध नागरिकांचे आराेग्य धाेक्यात आले आहे. यांसह तक्रारीत अनेक मुद्द्यांचा समावेश आहे. आगामी दिवसांत आयुक्त निमा अराेरा या समस्या निकाली काढतील, असा विश्वास यावेळी काही नागरिकांनी बाेलताना व्यक्त केला.