तज्ज्ञांच्या मते, वयस्क नागरिकांमध्ये प्रतिकारशक्ती कमी असल्याने कोरोनातून बरे झाल्यानंतरही अनेक आरोग्यविषयक तक्रारी समोर येतात. फुप्फुस, हृदयाची कार्यक्षमता कमी झाल्याने अनेकांना चालताना थकवा जाणतो. हृदयाचे ठोके वाढतात, काहींचे वजनही कमी होते. अशा लक्षणांची रुग्ण सर्वोपचारच्या पोस्ट कोविड वॉर्डात उपचारासाठी येत आहेत. यासंदर्भातील कोणतेही लक्षणे आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते त्यामुळे शासकीय किंवा आपल्या खासगी डाॅक्टरांकडून वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन तज्ज्ञ करतात.
सर्वोपचारमध्ये ३० रुग्णांनी केली तपासणी
जिल्ह्यात आतापर्यंत ८८१७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यापैकी ३० रुग्णांनी सर्वोपचारच्या पोस्ट कोविड वॉर्डात तपासणी केली आहे. यातील अनेक रुग्णांमध्ये फुप्फुसाच्या फायब्रोसिसशी संबंधित लक्षणे आढळून आल्याने त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आल्याची सर्वोपचारची माहिती आहे.
यांनी घ्यावी विशेष खबरदारी
फुप्फुस, हृदयाशी संबंधित किंवा इतर दुर्धर आजारांनी ग्रस्त असणारे रुग्ण, वयस्क रुग्ण यांना कोरोनाच्या संसर्गात गंभीर स्वरूपाची लक्षणे असल्यास अशांच्या फुप्फुसावर परिणाम झालेला दिसतो. अनेकांच्या फुप्फुसाची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होतो. त्यामुळे अशा रुग्णांनी लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.
कोरोनातून बरे झाल्यानंतरही काही रुग्णांमध्ये फुप्फुसावर झालेला परिणाम दीर्घकाळ राहू शकतो. त्यामुळे काही त्रास असल्यास संबंधित रुग्णांनी पोस्ट कोविड वैद्यकीय सल्ला घेणे महत्त्वाचे ठरते.
- डाॅ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला