अकोला : कोरोना विषाणू संसर्गाचा फैलाव रोखण्याच्या कार्यपद्धतीचा एक भाग म्हणून शहरातील व्यापारी, दुकानदार व त्यांच्याकडे काम करणारे कामगार, कर्मचाऱ्यांच्या कोविड चाचण्या तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शनिवारी दिले. चाचण्यांसाठी व्यापारी संघटनांनी व्यावसायिकांसह कामगार व कर्मचाऱ्यांची माहिती प्रशासनाला उपलब्ध करुन द्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात आयोजित व्यापारी संघटना प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण, मनपाचे प्रभारी आयुक्त पंकज जावळेकर, उपविभागीय अधिकारी डॉ.नीलेश अपार, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम यांच्यासह एमआयडीसी असोसिएशन, होलसेल व्यापारी असोसिएशन, ग्रेन मर्चंट असोसिएशन, मंगल कार्यालय चालक असोसिएशन, किराणा मर्चंट असोसिएशन, एलपीजी वितरक असोसिएशन, केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशन, हॉटेल असोसिएशन, केटरर्स असोसिएशन इत्यादी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कोरोना विषाणू संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी दिवसभरात अनेक लोकांच्या संपर्कात येणारे विविध दुकानदार व त्यांचे कामगार, कर्मचाऱ्यांच्या चाचण्या होणे आवश्यक आहे. त्यासाठी व्यापारी असोसिएशनने प्रशासनाला असोसिएशननिहाय चाचण्यांचे वेळापत्रक तयार करून द्यावे. या चाचण्यांसाठी चार पथके तयार करण्यात आली आहेत. याशिवाय वृत्तपत्र विक्रेते हॉकर्स, दूधवाले यांच्यासारख्या घरोघरी जाणाऱ्या घटकांच्याही चाचण्या करण्याचे नियोजन प्रशासन करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मंगल कार्यालयाच्या चालकांनी विवाह आयोजकांची लेखी हमी घेऊन, ५०पेक्षा अधिक एकही व्यक्ती अधिक उपस्थित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी दिला.
दागिने, लग्नाचा बस्ता खरेदीसाठी
पाचपेक्षा अधिक लोक नको!
रस्त्यावर फिरणारे, फेरीवाले यांच्यावर कोविड प्रतिबंधात्मक उल्लंघनाबाबत प्रशासन कारवाई करीत असून, दागिने व लग्नाच्या बस्ता खरेदीसाठीही पाचपेक्षा अधिक लोक येणार नाहीत, याची दक्षता स्वतः दुकान चालकांनी घ्यावयाची आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. गॅस ग्राहकांनी ऑनलाइन बुकिंगचा पर्याय अवलंबावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. याशिवाय कृषी उत्पन्न बाजार समितीतही येणारे लोक हे मास्कशिवाय येणार नाहीत, याची खबरदारी बाळगण्याचे त्यांनी स्पष्ट केले.