अकोला: कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता कहर बघता, जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी दर रविवारी जिल्हयात संपूर्ण संचारबंदी लागू करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यानुसार रविवार, २१ फेब्रुवारी रोजी संपूर्ण संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरु असून, नागरिकांचा प्रतिसाद मिळत असल्याने शहरातील रस्ते व बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पहावयास मिळत आहे.
जिल्ह्यात गेल्या वीस दिवसांपासून कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असून, कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात जमावबंदी लागू करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी १५ फेब्रुवारी रोजी दिला. त्यानुसार पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र जमता येणार नाही. जमावबंदी आदेशाची अंमलबजावणी सुरु करण्यात आल्यानंतर कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी पुढील आदेशापर्यंत दर रविवारी जिल्ह्यात संपूर्ण संचारबंदी तसेच दररोज रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी १८ फेब्रुवारी रोजी दिला. त्यानुसार रविवारी सकाळपासूनच अकोला शहरासह जिल्ह्यात संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरु झाली आहे. अकोला शहरातील सर्व बाजारपेठा बंद असून, सगळीकडे शुकशुकाट असल्याचे दिसून येत आहे. किरकोळ वाहनांची ये जा वगळता रस्ते ओस पडले आहेत. संचारबंदीची अंमलबजावणी व्हावी यासाठी पोलिसांचाही बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
ही सेवा राहणार सुरु!
संचारबंदीच्या कालावधीत शासकीय व खासगी ॲम्ब्युलन्स सेवा, रात्रीच्या वेळी सुरु राहणारी औषधांची दुकाने, ठोक भाजीपाला विक्री , दूध व दुग्धजन्य पदार्थ वक्री करणाऱ्या डेअरी, रेल्वे तसेच एसटी बस व खासगी लक्झरीने प्रवास करुन उतरणाऱ्या प्रवाशांसाठी ऑटोरिक्षा, राष्ट्रीय महामार्गावरील पेट्रोलपंप व ढाबे, एमआयडीसी क्षेत्रातील उद्योग इत्यादी सेवा सुरु राहणार आहेत.