अकोला: ‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार’ अभियान येत्या १५ जूनपर्यंत जिल्हयात राबविण्यात येणार असून, त्यामध्ये जिल्हयात जल प्रकल्पांमधील साचलेला गाळ काढण्याची कामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी गुरुवारी संबंधित यंत्रणांना दिले. ‘गाळमुक्त धरण- गाळयुक्त शिवार’ अभियानांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.
यावेळी जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते, उपजिल्हा जलसंधारण अधिकारी राजेश गिरी, उपजिल्हा जलसंधारण अधिकारी डी.एस.खंदारकर, जिल्हा परिषदेचे जलसंधारण अधिकारी एम. बी. काळे, मृद व जलसंधारण अधिकारी आर.एन. ठोके तसेच स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. ‘गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार ’ या अभियानांतर्गत जिल्हयातील कामांचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणांच्या आधिकाऱ्यांकडून घेतला. अभियानांतर्गत गाळ काढण्याच्या कामांमध्ये प्रति ब्रास गाळ वाहतुकीचा खर्च शासनाने भरावयाचा असून त्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्याचे सांगत, अशासकीय संस्थांनी गाळ काढण्याची कामे वेगात पूर्ण करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱी अरोरा यावेळी दिले.
जिल्हा परिषदेने सादर केली ६१ कामांची अंदाजपत्रके !‘गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार’ अभियान अंतर्गत जिल्हा परिषदमार्फत ६१ कामांची अंदाजपत्रके जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. . ही कामे ग्रामपंचायतींकडून प्रस्तावित करण्यात आली असून, या कामांना प्रशासकीय मान्यता देऊन, कामे तातडीने सुरु करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.