लोणार (जि. बुलडाणा): इंदिरा आवास योजनेंतर्गत सन २0१५-१६ साठी लोणार पंचायत समितीला ग्रामीण विकास यंत्रणेकडून मिळालेले २४१ घरांचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण झाले असून, तालुका अमरावती विभागात अव्वल ठरला आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांचे जीवनमान उंचाविण्यासाठी शासनाच्या वतीने दारिद्रय़रेषेखालील लाभार्थ्यांना इंदिरा आवास योजनेंतर्गत अनुसूचित जाती-जमाती, अल्पसंख्याक व नवबौद्ध, या प्रवर्गातील लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी १ लाख रुपयापर्यंत अर्थसहाय्य करण्यात येते. या योजनेमुळे ग्रामीण भागातील गोरगरीब नागरिकांना आपल्या हक्काचे पक्क्या घराचे बांधकाम करता आले. लोणार तालुक्याला सन २0१५-१६ करिता २४१ घरकुल मंजूर करण्यात आले होते. त्यानुसार गट विकास अधिकारी ओमप्रकाश यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. गट विकास अधिकारी गजानन पाटोळे तसेच वरिष्ठ अधीक्षक रवींद्र मापारी यांनी तालुक्यातील घरकुलापासून वंचित असलेल्या २४१ लाभार्थ्यांची निवड केली. यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील ९२, अनुसूचित जमाती प्रवर्गातील ३१, अल्पसंख्याक ७२ तर इतर दारिद्रय़रेषेखालील ४६ लाभार्थ्यांना घरकुलास प्रशासकीय मंजुरी मिळवून दिली. यापैकी १९७ लाभार्थ्यांना घरकुलाच्या बांधकामासाठी ६८ लक्ष ९५ हजार रुपयांच्या निधीतून पहिला हप्ता वितरित करण्यात आला. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून २0१५-१६ साठी मिळालेले २४१ घरांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात अमरावती विभागात लोणार तालुक्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तालुक्यात अजूनही अनेक कुटुंब घरकुल योजनेच्या लाभापासून वंचित असून, या लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळावा, याकरिता लोणार पंचायत समितीने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक १00 लाभार्थ्यांंच्या घरकुलांचे प्रस्ताव तयार असून, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून या प्रस्तावांना ही प्रशासकीय मंजुरी देण्याची मागणी गटविकास अधिकारी ओमप्रकाश यादव यांनी याप्रसंगी केली आहे.
इंदिरा आवास योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात लोणार तालुका विभागात अव्वल
By admin | Published: February 19, 2016 1:44 AM