अकोला : पाणी पुरवठ्याच्या कामांत यापूर्वी झालेल्या चुका सुधारून जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी उपाययोजनांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी गुरुवारी येथे दिले.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती व पाणीटंचाई निवारणासाठी उपाययोजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रामुख्याने आमदार गोवर्धन शर्मा, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, आमदार रणधीर सावरकर, महापौर विजय अग्रवाल, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, निवासी उपजिल्हाधिकारी राम लठाड, उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे, नागपूरचे पोस्ट मास्टर जनरल रामचंद्र जायबोले, तहसीलदार आशिष बिजवल उपस्थित होते.जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाच्या कामांचा तालुकानिहाय आढावा केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी घेतला. जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या ४३७ उपाययोजनांच्या कामांपैकी ३३६ कामे पूर्ण झाली असून, उर्वरित प्रगतिपथावर असलेली पाणीटंचाई निवारणाची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. धरणांतून सिंचनासाठी पाणी देताना पाणी वापर संस्थांच्या समन्वयाने नियोजन करावे, अशा सूचना देत मागणी येताच संबंधित गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्याचे निर्देशही संजय धोत्रे यांनी दिले. या बैठकीला जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार, अभयसिंह मोहिते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरुण वाघमारे, महावितरणचे अधीक्षक अभियंता कछोट, दूरसंचार विभागाचे महाव्यवस्थापक पवन बारापात्रे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.गांभीर्याने कामे करा; उपलब्ध निधी खर्च करा!कामे प्रलंबित राहिल्यास अडचणी निर्माण होतात. लोकांच्या समस्या निर्माण होतात. योजनांची अंमलबजावणी करणारे अधिकारी व लाभार्थी यांच्या समन्वयातून प्रलंबित प्रश्न व समस्या निकाली काढण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे योग्य समन्वय ठेवून गांभीर्याने कामे करण्याचे सांगत उपलब्ध निधी खर्च करून कामे मार्गी लावण्याचे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना दिले.‘वॉटर रिचार्ज शाफ्ट’ची कामे १५ जूनपर्यंत पूर्ण करा!नगरोत्थान योजनेंतर्गत महानगरपालिकामार्फत अकोला शहरात करण्यात येत असलेली ‘वॉटर रिचार्ज शाफ्ट’ची कामे येत्या १५ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना दिले. पाणी पुरवठा योजनांची कामेही पूर्ण करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याची ग्वाहीदेखील त्यांनी दिली.