अकोला : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत जिल्ह्यातील पात्र शिक्षकांना पदोन्नती देण्यासाठी बिंदुनामावली अद्ययावत करण्याचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या सभेत सोमवारी देण्यात आले.
जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील पात्र प्राथमिक शिक्षक व पदवीधर शिक्षकांना पदोन्नती देण्याची प्रक्रिया प्रलंबित आहे. त्यानुषंगाने या मुद्दयावर सभेत चर्चा करण्यात आली. शिक्षकांची बिंदुनामावली (रोस्टर) अद्ययावत करण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पात्र शिक्षकांना पदोन्नती देण्याची प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देश शिक्षण सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी प्राथमिक शिक्षण विभागाला दिले. तसेच सेवेत २४ वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना निवडश्रेणी लागू करण्यासाठी तातडीने प्रस्ताव बोलावून निवडश्रेणी लागू करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येणार असल्याची माहितीही शिक्षणाधिकाऱ्यांनी सभेत दिली. चटोपाध्याय वेतनश्रेणी लागू करण्यासाठी पात्र शिक्षकांच्या याद्यांची तपासणी करण्यात आल्यानंतर यादी समितीसमोर मंजुरीसाठी सादर करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकाऱ्यांनी सभेत दिली. शिक्षण व बांधकाम सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला समितीचे सदस्य रामकुमार गव्हाणकर, पवन बुटे , गणेश बोबडे, रिझवाना परवीन शेख मुख्तार, रंजना विल्हेकर, आम्रपाली खंडारे, प्रगती दांदळे, वर्षा वझिरे, प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली ठग आदी उपस्थित होते.