लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : नागरिक तक्रारी करतात, त्यावर कार्यवाही होईल, याचे आश्वासन आपण देतो; पण संबंधित नागरिकांची समस्या सुटत नसेल, तर शासनाच्या विषयी लोकांचे चुकीचे मत तयार होते. तक्रारी ऐकून घ्या, समस्येचे निराकरण तत्काळ होत असेल तर प्रलंबित ठेवू नका, केवळ प्रशासकीय उत्तरे देऊ नका, आज आलेल्या तक्रारीची दखल घेऊन किती दिवसात तिचा निपटारा होईल, ते आताच सांगा अन् दिलेल्या वेळेतच तक्रारींचा निपटारा झाला पाहिजे, पुढच्या सोमवारी पुन्हा आढावा घेईल, या शब्दात पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी अधिकार्यांना तंबी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या समवेत जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामामूर्ती, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकमसह विविध विभागातील प्रमुख उपस्थित होते.निगरुणा प्रकल्पातील पाणी सिंचनासाठी शेतकर्यांना उपलब्ध होईल का, वृद्ध कलावंतांचे मानधान, हिवरखेड येथील रस्ते तसेच जॉब कार्डधारकांना रोहयो अंतर्गत काम, अकोट शहरा तील राहुल नगर येथील पिण्याची पाइपलाइन टाकणे, पाणलोट विकास पथकाच्या सेवा खंडित केल्याबाबत तसेच गांधीग्राम ये थील घरकुल योजनेचा लाभार्थ्यांना नमुना ड मिळत नाही, अशा अनेक तक्रारी ऐकून घेत यावर संबंधित अधिकार्यांना दहा दिवसात कार्यवाहीचे निर्देश पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी दिले. यावेळी कला शिक्षकांसह आरोग्य, कृषी, सिंचन, शिक्षण विभाग, महसूल विभाग, वन विभाग, विद्युत विभाग, आदी विभागांतील तक्रारींचे तब्बल ७२ नागरिकांची निवेदने यावेळी पालकमंत्री डॉ. पाटील यांना देण्यात आली. या निवेदनांवर त्वरित कार्यवाही करून संबंधितांच्या तक्रारीचे निरासरण करण्याचे निर्देश पालकमंत्री यांनी यावेळी दिले.
शालेय पोषण आहाराचे अनुदान प्रलंबित का?शालेय पोषण आहाराचे अनुदान प्रलंबित असल्याबाबत पालकमंत्र्यांसमोर तक्रार येतातच. जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी कुळकर्णी यांना अनुदान प्रलंबित का आहे, याची विचारणा केली. यासंदर्भात चौकशी करून दोषींना कारणो दाखवा नोटीस बजावण्याचेही निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
प्राथमिक स्तरावर अधिकार्याकडून काय कार्यवाही करण्यात आली, याबाबत विचारणा करण्यात आली. नागरिकांची कामे करताना ते काम होईल की नाही, किती दिवसात होईल, याची शहानिशा यावेळी संबंधित अधिकार्यांकडून करण्यात आली, त्यामुळे आलेल्या प्रत्येक तक्रारीचे निर्धारित वेळेतच निराकरण होईल, याची नोंद घेतली जाईल. तसेच प्रत्येक तक्रारींचा आढावा घेतल्या जाणार आहे.-डॉ.रणजित पाटील, पालकमंत्री.