अकोला : जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते बारावीमधील विद्यार्थ्यांची आधार नोंदणी, तसेच आधार कार्ड अद्ययावत (अपडेट) करण्याचे काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शुक्रवारी जिल्हा प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाला दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार डाॅ. रणजित पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली ठग, माध्यमिक शिक्षणाधिकारी अवचार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. जिल्हा परिषद, महागनरपालिका, नगरपालिका, तसेच सर्व खासगी शाळांमधील इयत्ता पहिली ते बारावीमधील विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी, तसेच आधार कार्ड अद्ययावत करण्याचे काम जिल्ह्यात सुरू आहे. या कामाचा आढावा घेत, नियोजन करून, तसेच शाळांच्या ठिकाणी शिबिरे घेऊन, जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची आधार नोंदणी आणि आधार कार्ड अद्ययावत (अपडेट) करण्याचे काम येत्या ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शिक्षणाधिकाऱ्यांसह संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिले.