लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जिल्ह्यातील उपाययोजनांच्या कामाचा आढावा घेत, अकोला शहरातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील जोखमीच्या (हायरिस्क) व्यक्तींच्या चाचण्या तातडीने पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी शुक्रवारी सायंकाळी जिल्हा प्रशासनाला दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या व मृत्यूची वाढती संख्या यासंदर्भात आढावा घेत, उपचाराच्या पद्धती तसेच उपचार सुविधांच्या उपलब्धतेची माहिती विभागीय आयुक्तांनी घेतली. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या तपासणीवर भर देऊन, इतर आजारग्रस्त व कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील जोखमीच्या (हायरिस्क) व्यक्तींच्या चाचण्या तातडीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी दिले. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक अमोघ गावकर, आरोग्य उपसंचालक डॉ. फारुकी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, मनपा आयुक्त संजय कापडणीस, अतिरिक्त जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. अष्टपुत्रे, डॉ. शिरसाम, डॉ. राठोड, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. फारुक शेख यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
‘जीएमसी’तील ३६ ‘व्हेंटिलेटर’ तातडीने कार्यान्वित करा!शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला (जीएमसी) प्राप्त झालेले ३६ ‘व्हेंटिलेटर’ यंत्र तातडीने कार्यान्वित करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी दिले. तसेच बरे झालेल्या ज्या रुग्णांना घरी सोडले, अशा रुग्णांचा दैनंदिन १४ दिवस ‘फॉलोअप’ घेण्याचे सांगत, ‘रॅपीड टेस्ट किट’ खरेदीची प्रक्रिया पूर्ण करून संदिग्ध रुग्णांच्या चाचण्या करण्याचे नियोजन करण्याचे निर्देशही विभागीय आयुक्तांनी दिले.