अकोला: जिल्ह्यातल्या पूर्णा नदीवरील नेरधामणा बॅरेजचे रेंगाळलेले काम तातडीने पूर्ण करण्यासाठी गुरुवार, १ ऑक्टोबरपासून तीन दिवस जिल्हा सवरेदय मंडळ व बॅरेज संघर्ष समितीच्यावतीने पदयात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष, कृषी कीर्तनकार तथा बॅरेज संघर्ष समितीचे अध्यक्ष महादेवराव भुईभार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त नेरधामणा बॅरेजच्या प्रश्नावर जनजागृती करून, बॅरेजचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, तसेच खादी ग्रामोद्योग, स्वदेशी-स्वावलंबन विषयावर प्रबोधन करण्यासाठी पदयात्रा काढण्यात येणार आहे. १ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता वल्लभनगर येथून या पदयात्रेला प्रारंभ होणार आहे. १ ते ३ ऑक्टोबरदरम्यान आयोजित या पदयात्रेत निंभोरा, गांधीग्राम, गोपाळखेड, निराट-वैराट, राजापूर, नेरधामणा बॅरेज, पाळोदी व आगर येथे गावकर्यांची सभा आणि संवाद साधून, नेरधामणा बॅरेज प्रश्नासह पाणी प्रश्नावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या पदयात्रेत नेरधामणा बॅरेजची पाहणी व संबंधित अधिकार्यांसोबत चर्चा करण्यात येणार असून, ३ ऑक्टोबर रोजी आगर येथे सामूहिक प्रार्थना व ग्रामस्थांसोबत संवाद आणि सभेनंतर पदयात्रेचा समारोप होणार आहे. या पदयात्रेत अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे, बॅरेज संघर्ष समितीचे सचिव भाई प्रदीप देशमुख, सवरेदय मंडळाचे कोषाध्यक्ष अँड.रामसिंह राजपूत, भूदान मंडळाचे सदस्य वसंतराव केदार आदी सहभागी होणार असल्याचे महादेवराव भुईभार यांनी सांगितले. जून २0१६ मध्ये नेरधामणा बॅरेज अंतर्गत परिसरातील शेतकर्यांच्या शेतीचे ओलित झाले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. या पत्रकार परिषदेला प्रा.राजाभाऊ देशमुख, डॉ.पी.बी.काळे, डॉ.शे.ल.जाधव, रा.सु.बोंडे, वसंतराव महातळे, प्रा. बबनराव कानकिरड, राजेश बेले उपस्थित होते.
नेरधामणा बॅरेजचे काम पूर्ण करण्यासाठी आजपासून पदयात्रा
By admin | Published: October 01, 2015 1:47 AM