अकोला शासकीय पदभरतीत संगणक अर्हता सक्तीची करण्याचा व त्याचा उल्लेख शासकीय पदभरतीच्या जाहिरातीत करण्यासंदर्भातील शासन निर्णय ५ फेब्रुवारी रोजी जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेद्वारा घेण्यात येणाऱ्या जीसीसी-टीबीसी या संगणक टंकलेखन प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमांसोबतच वस्तूत: ज्या अभ्यासक्रमांना शासनाकडून संगणक अर्हता प्रदान केलेली आहे. त्या परीक्षांच्या पात्र असलेल्या संगणक अर्हतेबाबत परिपूर्ण तपशील काही विभागांच्या पदभरतीच्या जाहिरातींमध्ये त्या नमूद न केल्याची बाब निदर्शनास आली होती. त्यामुळे संगणक अर्हतेचे प्रमाणपत्र असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना देखील आवेदनपत्र भरताना अडचणी येत होत्या. तेव्हा आता ज्या अभ्यासक्रमांना संगणक अर्हता म्हणून शासनाने मान्यता दिलेली आहे, त्या अभ्यासक्रमांचा समावेश त्या संवर्गातील पदभरतीसाठी प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या जाहिरातींमध्ये करणे ही संबंधित विभाग, कार्यालयांची जबाबदारी आहे.
शासकीय विभाग, कार्यालये, महामंडळे, स्वायत्त संस्था, शासनाचे विविध उपक्रम इत्यादींच्या पदभरती जाहिरातींमध्ये संगणक अर्हतेसाठी जीसीसी-टीबीसीचा उल्लेख होत नव्हता. त्यामुळे लाखो विद्यार्थी, पालक यांसोबतच संस्थाचालकांमध्ये संभ्रम होता. शासनाने काढलेल्या परिपत्रकाने तो दूर झाला आहे.