अकोला, दि. २८: केशवनगरातील जानोरकर मंगल कार्यालयात सुरू असलेल्या ५५ व्या अखिल भारतीय अंकुर साहित्य संमेलनाचा रविवार, २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता थाटात समारोप झाला. संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धुळे येथील साहित्यिक प्रा. डॉ. फुला बागूल, तर प्रमुख अतिथी म्हणून मनपाचे गटनेता गजानन गवई, समाजसेवक गुणवंतराव जानोरकर, रंगकर्मी रमेश थोरात उपस्थित होते. दरम्यान शेवटच्या दिवशी विविध कार्यक्रम पार पडले यामध्ये कथाकथन, गझल मुशायराला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.अंकुर साहित्य संघाचे संस्थापक हिंमत शेकोकार यांच्या स्मृतिनिमित्त आयोजित या द्विदिवसीय साहित्य संमेलनाला शनिवारी प्रारंभ झाला. संमेलनाच्या दुसर्या दिवशी रविवारी सकाळी ९ वाजता कथाकथन, ११ वाजता गझल मुशायरा, तर दुपारी १.३0 वाजता परिसंवाद कार्यक्रम पार पडला. ५ वाजता पार पडलेल्या समारोपीय कार्यक्रमाला आमदार हरिदास भदे, प्रा. डॉ. संतोष हुशे, नगरसेवक दिलीप देशमुख यांचीदेखील प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रा. डॉ. फुला बागूल यांचे अध्यक्षीय भाषण झाले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते 'महानायक' या महानाट्याचे निर्माते नीलेश जळमकार यांना हिंमत शेकोकार स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच संदीप देशमुख यांना 'अंकुरमित्र', व सुरेश लांडे यांना 'अंकुररत्न' पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या बनाफकर यांनी केले.
‘अंकुर’ साहित्य संमेलनाचा थाटात समारोप
By admin | Published: August 29, 2016 1:24 AM