अकोला: आपत्कालीन सेवा देणाऱ्या बहुतांश शासकीय रुग्णवाहिका खिळखिळ्या झाल्या असून, त्यांच्या मेंटनन्सकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे. यासंदर्भात जानेवारी २०१९ मध्ये आयुक्त आरोग्य सेवा यांनी रुग्णसेवाच्या मेंटनन्ससंदर्भात विशेष सूचनादेखील दिल्या होत्या; परंतु या सूचनांकडे दुर्लक्ष करीत तीन महिन्यांत एकही आढावा आरोग्य विभागाकडून घेण्यात आलेला नाही.रुग्णवाहिका ही रुग्णांसाठी जीवनदायिनी आहे. आपत्कालीन परिस्थितीत वेळेवर पोहोचून रुग्णवाहिका दररोज शेकडो प्राण वाचविते; पण खराब रस्ते अन् सरकारी यंत्रणेच्या तिच्या मेंटनन्सकडे झालेल्या दुर्लक्षामुळे या रुग्णवाहिकांनाच उपचाराची गरज आहे. शासकीय यंत्रणेंतर्गत गर्भवतींसाठी ग्रामीण भागात १०२ क्रमांकाची रुग्णवाहिका मोलाची भूमिका बजावते; परंतु खिळखिळ्या अवस्थेत धावणाऱ्या या रुग्णवाहिकेत गर्भवतींचा प्रवास वेदनादायकच होत आहे. शिवाय, आवश्यक सुविधांचाही अभाव आहे. यासोबतच दररोज शेकडो प्राण वाचविणारी १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेलाही मेंटनन्सअभावी उपचाराची गरज भासू लागली आहे. नादुरुस्त असल्या तरी रस्त्यावर धावताहेत, या धोरणाने प्रशासन रुग्णवाहिकांच्या मेंटनन्सकडे दुर्लक्ष करीत आहे; पण हा प्रकार रुग्णांच्या जीवावरदेखील बेतू शकतो, हे नक्की.खासगी रुग्णवाहिकाही नादुरुस्तशासकीय १०२ किंवा १०८ रुग्णवाहिकाच नाही, तर खासगी रुग्णवाहिकांचीही हीच स्थिती आहे. दाम घेत असले तरी तशी सुविधा रुग्णांना मिळत नाही. खिळखिळ्या झालेल्या या रुग्णवाहिकांच्या तपासणीकडे आरोग्य यंत्रणेचे दुर्लक्ष असल्याने हा प्रकार रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकतो.या आहेत सूचनारुग्णवाहिका १०२ आणि १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका सुस्थितीत राहतील, याची खात्री जिल्हा शल्यचिकित्सक किंवा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी करावी, आरोग्य उपसंचालकांनी याचा आढावा घेणे गरजेचे आहे.