राहुल सोनोने
दिग्रस बु. : पातूर तालुक्यातील सस्ती येथील ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी क्रमांक ४ व ५ या इमारतींची दयनीय अवस्था झाली असून, टिनपत्रे फुटल्याने अंगवाड्यांच्या छताला गळती लागली आहे. छतातून गळणाऱ्या पाण्यामुळे चिमुकल्यांचा आहार भिजून नुकसान होण्याची भीती आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
शासन स्तरावरून विविध योजनांतून अंगणवाडीतील चिमुकल्यांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. या माध्यमातून डिजिटल बनविण्यासाठी प्रयत्न सुरू असतात; परंतु सस्ती येथील अंगणवाडी याला अपवाद ठरत आहे. सस्ती येथील अंगवाडी इमारतीची दयनीय अवस्था झाली असून, टिनपत्रे फुटले आहेत. त्यामुळे चिमुकल्यांसह अंगवाडी सेविकांनाही त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्याच्या दिवसात अंगणवाडी इमारतीला गळती लागल्याने आहार भिजण्याची भीती व्यक्त होत आहे. याकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी लक्ष देऊन दुरुस्तीची मागणी होत आहे.
-----------------------
पावसाचे पाणी थांबविण्यासाठी भांड्यांचा वापर!
छताला गळती लागल्याने पाणी साचत असून, हे पाणी थांबविण्यासाठी इमारतीच्या खोलीत सर्वत्र भांडी दिसून येत आहेत, तरीही खोलीत पाणी साचत असून, यामध्ये चिमुकल्यांना आहार दिल्या जात आहे. त्यामुळे या इमारतीची डागडुजी करून टिनपत्र्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
-------------------------
अंगणवाडीसमोरील परिसरात गवत वाढल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तसेच पावसाळ्यात छताला गळती लागल्याने खोलीत ठेवलेला शिशू पोषण आहार पाण्याने भिजत आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन दुरुस्ती करावी.
-विठ्ठल खडके, पालक.
-----------------
अंगणवाडी क्र.४ व ५ च्या छताला गळती लागली असून, शिशू पोषण आहार भिजण्याची भीती आहे. तसेच ओलसर खोलीतच चिमुकल्यांना जावे लागत असल्याने आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे लक्ष देऊन त्वरित काम करावे.
-सुनील रमेश बंड, ग्रामपंचायत सदस्य, सस्ती.