रोहनखेड : अकोट तालुक्यातील बांबर्डा येथे दहा वर्षांपूर्वी स्मशानभूमीचे बांधकाम करण्यात आले होते. स्मशानभूमी असुविधेसाठी परिचित आहे ; मात्र सद्यस्थितीत स्मशानभूमीची दुरवस्था झाली असून, शेडची दुर्दशा झाली आहे. याबाबत संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असून, पावसाळ्याच्या दिवसात ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
बांबर्डा येथे स्मशानभूमीतील काही टीन पत्रे उडून गेली असून, काही टीनांना गळती लागली आहे. स्मशानभूमीला आवार भिंत नसल्यामुळे परिसरात गुरांचा व व कुत्र्यांचा मुक्तसंचार असतो. तसेच परिसरात झुडपे वाढली असून, गवताचे साम्राज्य निर्माण झाले आहेत. तसेच स्मशानभूमीत पिण्याच्या पाण्याची सोय नाही. अंत्ययात्रेत येणाऱ्या लोकांना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था नाही. त्यामुळे उन्हाळ्यात नागरिकांना उन्हाचा, तर पावसाळ्यात चिखलामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. स्मशानभूमीला जोडणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने नागरिकांना चिखल तुडवीत स्मशानभूमीत जावे लागते. पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. याकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी लक्ष देऊन स्मशानभूमीची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
---------------------
स्मशानभूमी मधील टीन शेड उडून गेले आहेत. तसेच पावसाळ्यात उर्वरित छताला गळती लागत असल्याने अंत्यविधीसाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्याचे खडीकरण न केल्याने रस्ता चिखलमय झाला आहे. रस्त्याची दुरुस्ती करण्याची गरज आहे.
- रोशन ओईंबे, नागरिक, बांबर्डा.
-------------------------
टीनपत्रे गेली उडून !
बांबर्डा येथील स्मशानभूमीतील टीनपत्रे उडून गेली आहेत, तर काही टीनपत्र्यांना गळती लागली आहे. तसेच लोखंडी ॲंगल ही नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
---------------------------
यापूर्वी स्मशानभूमीच्या दुरुस्तीचा प्रस्ताव पाठविला किंवा नाही, मला माहीत नाही. मात्र पुढील दिवसात स्मशानभूमीचे दुरुस्तीसाठी ठराव प्रशासनाकडे पाठवणार आहे.
-रीना प्रदीप सूर्यवंशी, सरपंच, बांबर्डा