अकोल्यासह शेजारील जिल्ह्यातही कोरोनाचा कहर सुरूच असून गंभीर रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे जिल्ह्याबाहेरील अनेक रुग्ण उपचारासाठी अकोल्यात दाखल होत आहेत. रुग्ण गंभीर असल्याने त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईकही येत आहेत, मात्र कोविड रुग्ण असल्याने त्यांच्यासोबत नातेवाईकांना राहता येत नाही. त्यामुळे अशा रुग्णांचे नातेवाईक रुग्णालय परिसरातच २४ तास राहत असल्याने त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रुग्णालयात अपुऱ्या व्यवस्थेमुळे रुग्णांचे, तर बाहेर त्यांच्या नातेवाईकांचे हाल होत आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
कोविड रुग्णांचे नातेवाईक म्हणतात...
भावाचा कोविड अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याला अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. अकाेल्यात नातेवाईक आहेत, परंतु कोरोनामुळे त्यांच्याही घरी जाणे शक्य नाही. त्यामुळे रुग्णालय परिसरातच दिवस काढावे लागत आहेत.
- अमित भावसार, माटरगाव (जि. बुलडाणा)
बुलडाणा जिल्ह्यात आवश्यक औषध उपलब्ध नसल्याने आमच्या रुग्णाला अकोल्यात दाखल केले. कोरोनामुळे रुग्णाजवळ जाता येत नसल्याने रुग्णालय परिसरातच राहावे लागत आहे. नातेवाईकांकडेही जाता येत नाही.
- गोपाल काळे, इच्छापूर (जि. बुलडाणा)
कोरोनामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. चांगला उपचार होईल या आशेने आमच्या रुग्णाला अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले आहे. रुग्णाजवळ नातेवाईक हवे म्हणून आम्हाला रुग्णालय परिसरात राहावे लागत आहे. रुग्णालय परिसरात अस्वच्छता आणि डासांचा प्रादुर्भाव असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांचेही आरोग्य धोक्यात आहे.
- विठ्ठल तांदुळकर, नांदुरा (जि. बुलडाणा)
नातेवाईकांकडे जाता येत नाही अन् दुकानात काही मिळत नाही
कोविड रुग्णाच्या संपर्कात असल्याने शहरातील नातेवाईकांकडे जाणे शक्य नाही, तर लॉकडाऊनमुळे बाजारपेठ बंद असल्याने दुकानातही काही मिळत नाही. कोविड रुग्णांसोबत आलेल्या त्यांच्या नातेवाईकांचे रुग्णालय परिसरात हाल होताना दिसून येत आहेत.