- नितीन गव्हाळे
अकोला: मंगळवारची सकाळची ११.३0 वाजताची वेळ...नवीन बसस्थानक...पुसद-अनसिंग-वाशिम बसगाडी पातूर-मेडशी-मालेगाव मार्गे धावायला लागली. प्रवास सुरू झाला. बसगाडी प्रवाशांनी खचाखच भरलेली...अकोला लोकसभा मतदारसंघात येणाºया मेडशी आणि मालेगाव तालुक्यातील सर्वाधिक प्रवासी आणि त्यांच्यासोबत सुरू झाला राजकीय गप्पांचा फड.मालेगाव तालुक्यातील पांग्री नवघरे येथील शेतकरी अशोक नवघरे यांनी, शेतमालाला हमीभाव मिळत नाही. कर्जमाफी देताना, शासनाने अटी लादल्या. किसान सन्मान निधी योजनेची रक्कम फार कमी लोकांच्या खात्यात जमा झाली. शेतकºयांचे भले करायचे असेल तर सिंचनाची सुविधा, हमीभाव, सरसकट कर्जमाफी देणारे सरकार निवडून येण्याची गरज आहे. थापा मारणारे नकोत, असे मतही नवघरे यांनी व्यक्त केले. वाशिम येथील शेतकरी नारायण आरू यांनी मोदी सरकारवर तोंडसुखच घेतले. ते म्हणाले, आधी बॅलेटपेपरने मतदान घ्यावे. अन्यथा लोकशाहीची हत्या होईल. अशी भीतीच त्यांनी व्यक्त केली. महागाई वाढली. दरवर्षी रासायनिक खते, औषधांचे भाव वाढतात; परंतु शेतमालाचे भाव वाढत नाही. शेतकºयांचा सन्मान करणारे सरकार हवे असल्याचे मत त्यांनी मांडले. मालेगावची विद्यार्थिनी मीनाक्षी व्यवहारे हिने, विकासाच्या बाबतीत मालेगाव, रिसोड भाग मागासलेला आहे. उच्च शिक्षणाची सोय नाही. सरकारने विकासकामे केली खरी; परंतु आम्हा युवकांना रोजगार मात्र उपलब्ध करून दिला नाही. युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे मत तिने व्यक्त केले. मालेगावाचे अमोल केंद्रे याने भाजप सरकारच्या काळात भ्रष्टाचार, दहशतवाद कमी झाला. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची चांगली प्रतिमा मोदींनी निर्माण केल्याचे मत व्यक्त केले. रिसोडचे उत्तमराव बोडखे यांनी, कोणतेही सरकार आले तरी फार बदल होणार नाही, असे मत मांडले. रिसोडचे अरुण मगर यांनी, रोजगार उपलब्ध करणारे, उद्योगधंद्यांना चालना देणारे सरकार सत्तेत यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
भाजप सरकार हे शेटजी-भटजींचे
मालेगाव तालुक्यातील दहीगावचे नंदू गव्हांदे यांनी, भाजप सरकार हे शेटजी-भटजींचे आहे. गरिबांचे सरकार नाही. शेतकऱ्यांचे तर मुळीच नाही. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही. पिकांना पाणी मिळत नाही. त्यामुळे शेतकºयांचे भले करणारे सरकार सत्तेत यावे. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मालेगावच्या माया इंगोले यांनी, सरकारने रस्ते, दिवाबत्तीची सोय केली. मतदारसंघात आरोग्याच्या सुविधा नाही. त्या उपलब्ध करून देण्याची अपेक्षा व्यक्त केली.
खते, औषधे महागतात, मग शेतमालाचे भाव का वाढत नाहीत?दरवर्षी पेरणीचा हंगाम आला की, रासायनिक खते, फवारणीची औषधे महागतात; परंतु दर वर्षाला शेतमालाचे भाव वाढत नाहीत. जोपर्यंत शेतमालाला सन्मानजनक दर मिळत नाही. तोपर्यंत शेतकरी आणि शेतीचा विकास होणार नसल्याचे मत मोपचे राजू खरडे यांनी व्यक्त केले.