जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय पीक विमा समितीची बैठक झाली. या बैठकीस कृषी विभागाचे अधिकारी तसेच विमा कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यात अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांपैकी पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांच्या १३२५८ पूर्वसूचना प्राप्त झाल्या आहेत, अशी माहिती एचडीएफसी एर्गो या विमा कंपनीच्या जिल्हा प्रतिनिधींनी माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी अरोरा म्हणाल्या की, नुकसान झालेले कोणीही विमाधारक शेतकरी पीक विमा लाभापासून वंचित राहता कामा नये, असे पाहावे. अतिवृष्टीमुळे ज्या मंडळात जास्त पाऊस झाल्यामुळे नुकसान झाले आहे. अशा क्षेत्रात हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे लागू करायचे अधिसूचनेपूर्वी तालुका स्तरावरील अधिकारी व पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी यांनी संयुक्त पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
संत्रा अनुदान द्या
मृग बहरात अकोट तालुक्यातील अकोलखेड मंडळातील संत्रा पिकाचे अनुदान देणे बाकी आहे ते त्वरित एआयसी विमा कंपनीने अदा करावे. तसेच १५ मे २०२० रोजी आंबिया बहर अंतर्गत अकोट तालुक्यात वेगाच्या वाऱ्यामुळे केळी पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची फरकाची रक्कम एआयसी विमा कंपनीने त्वरित अदा करावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले.