जिल्हाधिकारी यांच्या दालनात राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत संयुक्त सक्रिय कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध व नियमित संनियंत्रण समिती आढावा बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. यावेळी मनपा आयुक्त निमा अरोरा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. मनीष शर्मा, मनपाचे सहा. क्षयरोग अधिकारी डॉ. अस्मिता पाठक, वैद्यकीय अधिकारी एस. डी. बाबर आदी संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा समन्वय समिती सभेमध्ये जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्देश दिले की, जिल्ह्यातील कुष्ठरोग व क्षयरोग रुग्णांचा शोध घेण्याकरीता १ जुलै २०२१ ते ३० मार्च २०२२ या कालावधीत शोध मोहीम कार्यक्रम यशस्वी व प्रभावीपणे राबवा. याकरीता जिल्हा व ग्रामस्तरावरील आशा व पुरुष स्वयंसेवक व विविध स्तरावरील पर्यवेक्षकांना प्रशिक्षित करा. प्रशिक्षित पथकाव्दारे गृहभेटी देऊन रुग्णांचा कायमस्वरुपी रेकॉर्ड तयार करावा. शोध मोहिमेकरीता सूक्ष्मकृती आराखड्यानुसार अभियानाचे नियोजन करून जिल्ह्यातील अतिजोखमीच्या तालुक्यात सर्वेक्षण तातडीने करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी दिले.