अकोला : जिल्ह्यात सहा दिवसांसाठी कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात देशी व विदेशी दारूची दुकाने बंद असल्याने दारूचा मोठा साठा उगवा येथील एका शेतात खोदकाम करून ठेवण्यात आला होता. या दारूची संचारबंदीत अतिरिक्त दराने विक्री होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी शेतात छापा टाकून खड्ड्यांमध्ये साठवून ठेवलेला दारूचा साठा शनिवारी रात्री उशिरा जप्त केला.
कडक लॉकडाऊनच्या काळात अव्वाच्या-सव्वा भावात विक्री करण्यासाठी एका शेतात खोदकाम करून लपवून ठेवलेला उगवा येथील देशी दारूच्या दुकानातील देशी दारूचा मोठा साठा अकोट फाइल पोलिसांना जप्त करण्यात यश आले आहे. अकोट फाइल पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या, उगवा गावात देशी दारू दुकानातील देशी दारूचा साठा, कडक लॉकडाऊनच्या काळात चढ्या भावाने विक्री करण्यासाठी, उगवा हद्दीतील एका शेतात खड्डा करून लपवून ठेवल्याची गोपनीय माहिती अकोट फाइल पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे अकोट फाइलचे ठाणेदार महेंद्र कदम यांनी गुन्हे शोध पथकाला कामाला लावले. देशी दारू लपवून ठेवली ते ठिकाण गाठल्यानंतर पोलीस आल्याची चाहूल दारू लपवून ठेवणाऱ्यांना लागल्याने आरोपींनी दारू वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणारे वाहन आणि दोन मोबाइल जाग्यावर ठेवून पळून गेले. या कारवाईत अकोट फाइल पोलिसांनी मात्र १ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अकोट फाइल पोलीस हा लपवून ठेवलेला साठा उगवा येथील दुकानातील आहे का तसेच दारूची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेले वाहन कोणाचे, या दिशेने तपास करीत आहेत. ही कारवाई अकोट फाइल पोलीस ठाण्याचे ठाणेदार महेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन सुशीर, सुनील टोपकर, उज्ज्वला इंगळे यांनी केली.