अकोला : औद्योगिक वसाहतमधील फेज क्रमांक दोन मध्ये रुंगटा टायर्ससमोर मंगळवारी रात्री झालेल्या गोळीबारप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून हत्याकांडात वापरलेला देशीकट्टा व जिवंत काडतूस गुरुवारी जप्त केले. या आरोपींची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने आरोपींच्या पोलीस कोठडीत ७ जुलैपर्यंत वाढ केली आहे.शिवणी परिसरातील रामनगर येथील रहिवासी संतोष घनश्याम शर्मा (३0) हे औद्योगिक वसाहतीतील श्रीहरी दालमिलमधून काम आटोपल्यानंतर दुचाकीने घराकडे जात असताना रुंगटा टायर्स समोरच्या पहिल्याच वळणावर पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात मारेकर्यांनी त्यांच्या कानाजवळ व मस्तकावर देशी कट्टय़ाने गोळी झाडून हत्या केली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी मध्य प्रदेशातील शिवणी येथील रहिवासी बबलू ऊर्फ रामेश्वर सनोदिया (२२) व गोलू ऊर्फ ईश्वर सनोदिया या दोन आरोपींना अटक केली. या दोन्ही आरोपींनी सुपारी घेऊन हत्या केल्याची माहिती दिली आहे. यामध्ये आणखी एका आरोपीचा समावेश असल्याच्या संशयावरून पोलीस या आरोपीचा शोध घेत आहेत. दरम्यान, दोन्ही आरोपी पोलीस कोठडीत असताना त्यांची कसून चौकशी केली असता, आरोपींकडून हत्येसाठी वापरलेला देशीकट्टा व जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहेत. या आरोपींना गुरुवारी दुपारी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने दोन्ही आरोपींना ७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या आरोपींची आता कसून चौकशी करण्यात येणार असून, त्यांच्या चौकशीमध्ये गुन्हय़ासंबंधी माहिती उघड होण्याची शक्यता आहे.
आरोपींकडून देशीकट्टा व जिवंत काडतूस जप्त
By admin | Published: July 01, 2016 2:09 AM