विजय शिंदे
अकोटः शहरातील राज्य उत्पादन शुल्क कार्यालय व मुख्याधिकारी निवासस्थानाला आग लागल्याची घटना २० फेब्रुवारी रोजी उघडकीस आली. मुख्याधिकारी निवासस्थान व राज्य उत्पादन शुल्क कार्यालय या दोन्ही इमारतीत वीजपुरवठाच नसल्याने आग लागली की लावली, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
अकोट येथील राज्य उत्पादन शुल्ल कार्यालय व मुख्याधिकारी निवासस्थान या दोन्हीही इमारतीत वीजपुरवठा सुरू नसताना लागलेल्या आगीत ५५ लाखांच्या शासकीय मालमत्तेचा कोळसा झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने संचारबंदी घोषित केली. दरम्यान, रात्री उशिरा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालय तसेच मुख्याधिकारी निवासस्थानाला आग लागल्याची घटना घडली. आग एवढी भीषण होती की, आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण झाले होते. आग आटोक्यात आणण्यासाठी संपूर्ण रात्र लागली. दोन्ही इमारतीत वीजपुरवठा नसल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणावर आग लागली कशी, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. या घटनेकडे प्रशासकीय यंत्रणेने कानाडोळा केला आहे. या घटनेचा पंचनामा तलाठी एम. व्ही. पाटील यांनी केला. मात्र, पंचनाम्यात आगीचे कारण स्पष्ट होऊ शकत नसल्याचे नमूद केले. त्यामुळे या घटनेची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
--------------------------
दोन्ही शासकीय मालमत्तेच्या आगीबाबत अपघात रजिस्टरला नोंद घेण्यात आली असून, चौकशी सुरू आहे.
-संतोष महल्ले, पोलीस निरीक्षक, अकोट.
----------------------------
राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात कुठलाही वीजपुरवठा घेतलेला नाही. साधे वीजमीटरसुद्धा नाही. त्यामुळे ही आग मुख्याधिकारी निवासस्थानातून लागत आली होती.
-डी. ओ. कुटेमाटे, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क.
-----------------------------------
अनेक दिवसांपासून निवासस्थान बंद आहे. मुख्याधिकाऱ्यांच्या निवासस्थानी मीटरच नसल्यामुळे वीजपुरवठा खंडित होता. या निवासस्थानमधील वीजमीटर काढून नेले आहे.
- सिध्दार्थ मोरे, वीज अभियंता नगर परिषद