अकोला : मागील नोव्हे.-डिसेंबर महिन्यात राज्यात बंदी घातलेल्या वादग्रस्त पाच कीटकनाशकांच्या विक्रीबाबत शेतकरी आणि कृषी केंद्र संचालकांमध्ये पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे.कीटकनाशकांच्या वापरामुळे ६३ शेतकरी मजुरांचा बळी गेल्याचा धक्कादायक अहवाल समोर आल्यानंतर राज्य शासनाने मागील वर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात वादग्रस्त पाच कीटकनाशकांवर बंदी घातली होती. बंदी घातलेल्या कीटकनाशकांमध्ये अॅसिफेट ७५ टक्के एसपी, मोनोक्रोटोफॉस ३६ टक्के एसएल, डायफेनथीयूरॉन ५० टक्के डब्ल्यूपी, पिप्रोनील ४० टक्के अधिक ईमडाक्लोप्राईड, प्रोफेवोफॉस ४० टक्के यांचा समावेश आहे. अकोलासह विदर्भात बंदी आणल्याने विक्री करणाऱ्या कृषी केंद्रावर कारवाया झाल्यात. ही झाली मागील वर्षाची स्थिती. यंदा मात्र या पाच कीटकनाशकांसदर्भात अद्याप कोणताही आदेश शासनाचा नाही. पाचही कीटकनाशकांचा वापर विदर्भात सर्रास होतो. विदर्भात कापसाचा पेरा जास्त असून, गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात जाणवतो. अशावेळी विदर्भातील शेतकरी अॅसिफेट आणि मोनोक्रोटोफॉसचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. कीटकनाशकांची फवारणी करताना नीट काळजी न घेतल्याने शेतमजूर मरण पावल्याचे कीटकनाशक कंपनीचे म्हणने आहे. त्यामुळे पुन्हा बंदीचा आदेश निघालेला नाही. जर या कीटकनाशकांचा वापर केला नाही तर विदर्भातील कापसाच्या उत्पादनावर फरक पडतो. त्यामुळे उपरोक्त कीटकनाशके विकायचे की नाही, असा प्रश्न कृषी केंद्र संचालकांना पडला आहे. दरम्यान, कृषी अधिकारी यांनादेखील यासंदर्भात स्पष्ट निर्देश नसल्याने शेतकरी संभ्रमात सापडले आहेत.उपरोक्त पाच कीटकनाशकांवर बंदी घातल्याचा आदेश दोन महिन्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपात आला होता. पुन्हा तसा आदेश आला तरच आम्ही कृषी केंद्र संचालकांवर कारवाई करू, अन्यथा अशी कारवाई नियमबाह्य ठरेल.-एम.बी.जवंजाळ, प्रभारी कृषी अधिकारी, अकोला.