लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : सद्या सुरू असलेली बारावीची परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात व्हावी, यासाठी शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरू आहेत; मात्र धावंडा येथील प्रशिक विद्यालय या परीक्षा केंद्रावर सर्वसंमतीने गैरप्रकार सुरू असल्याचा अहवाल सहायक परीक्षक प्रा. सुनील काळे यांनी मानोरा पंचायत समितीकडे शनिवारी सादर केला. यामुळे शिक्षण वर्तुळात मोठी खळबळ उडाली.सहाय्यक परीक्षक प्रा. सुनील काळे यांची धावंडा येथील प्रशिक विद्यालय परीक्षा केंद्र क्रमांक ९७३ वर इंग्रजी पेपरसाठी नियुक्ती करण्यात आली होती. या परिक्षा केंद्रास माध्यमिक शिक्षणाधिकारी तानाजी नारळे व गटशिक्षणाधिकारी अनिल पवार यांनी भेटी दिल्या. त्यावेळी परिक्षा केंद्रावर प्रचंड प्रमाणात कॉपीचा गैरप्रकार सुरु असल्याचे निदर्शनास आले. या गैरप्रकारासाठी केंद्रावर नियुक्त सर्वचजण जबाबदार आहे व सुरू असलेल्या गैरप्रकाराला सर्वांची समर्थ साथ असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय परिक्षा केंद्रावर पोलिस बंदोबस्त देखील अपुरा राहतो व बैठक व्यवस्थ सुद्धा कमकुवत असल्याचे प्रा. काळे यांनी अहवालात म्हटले आहे. तथापि, प्रशिक विद्यालय या केंद्रावरील परिक्षा कॉपीमुक्त वातावरणात व्हायची इच्छा असेल तर दिवसभर शासकीय पथक केंद्रावर हजर असणे आवश्यक आहे, अशा स्पष्ट सूचनाही प्रा. काळे यांनी अहवालात दिल्या आहेत. यामुळे एकच खळबळ माजली.दरम्यान, सदर अहवाल अमरावती बोर्डाकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती परीक्षक बी.बी. लोखंडे यांनी दिली.
बारावीच्या पेपरमधील ‘कॉपी’चा गोंधळ सर्वसंमतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 3:19 PM