- संतोष येलकर
अकोला : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि ‘लॉकडाऊन’च्या पृष्ठभूमीवर एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेंतर्गत गरीब लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना प्रतिमहा, प्रतिशिधापत्रिका एक किलोप्रमाणे तूर किंवा हरभरा यापैकी एका डाळीचे मोफत वितरण करण्यात येत आहे; मात्र २६ जूनपर्यंत जिल्ह्यात कुठे तीन किलो तर कुठे दोन किलो मोफत डाळीचे वितरण शिधापत्रिकाधारकांना करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील गरीब शिधापत्रिकाधारकांना मोफत डाळीच्या वितरणात गोंधळ निर्माण झाल्याची बाब समोर येत आहे.कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी गत २४ मार्चपासून लागू करण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’च्या परिस्थितीत प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत राज्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील प्राधान्य गट व अंत्योदय योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारक लाभार्थींना एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत प्रती शिधापत्रिका एक किलो तूर किंवा हरभरा यापैकी एका डाळीचे मोफत वितरण करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत गत १८ एप्रिल रोजी घेण्यात आला होता. त्यानुसार जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारक लाभार्थींना एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी मोफत डाळीचे वितरण जिल्हा पुरवठा विभागामार्फत रास्त भाव दुकानांमधून सुरू करण्यात आले. जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारक लाभार्थींना एप्रिल ते जून या तीन महिन्यातील प्रतिशिधापत्रिका तीन किलो मोफत डाळीचे वितरण अपेक्षित असताना २६ जूनपर्यंत जिल्ह्यात कुठे तीन किलो तर कुठे दोन किलो मोफत डाळीचे वितरण शिधापत्रिकाधारकांना करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात गरीब शिधापत्रिकाधारकांना मोफत डाळ वितरणात गोंधळ निर्माण झाल्याचे वास्तव समोर येत आहे.९,२४० क्विंटल डाळ तालुकास्तरावर वितरित!जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत प्रतिमहा एक किलोप्रमाणे मोफत डाळ वितरित करण्यासाठी प्रतिमहा १ हजार ८५० क्विंटल हरभरा डाळ व १ हजार २३० क्विंटल तूर डाळ याप्रमाणे तीन महिन्यांसाठी ९ हजार २४० क्विंटल डाळ साठा जिल्हा पुरवठा विभागामार्फत जिल्ह्यातील तालुकास्तरावर वितरित करण्यात आला.