सचिन राऊत / अकोलागोरगरिबांसाठी सुरू करण्यात आलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या लाभासाठी उपचाराआधी रुग्णांमागे असलेली कागदपत्रांच्या पूर्ततेची कटकट थांबली आहे. जीवनदायीच्या लाभासाठी कागदपत्रांच्या सोबतच आरोग्य पत्र बंधनकारक करण्यात आले होते; मात्र या कागदपत्रांमुळे गोंधळ उडाल्याने आणि रुग्णांसाठी या योजनेचा लाभ घेणे अडचणीचे ठरत असल्याने शिधापत्रिकेची अट शिथिल करण्यात आली असून, आरोग्य पत्रही काही कालावधीनंतर देण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेणे रुग्णांसाठी आता सरळ झाले आहे.राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांना संबंधित रुग्णालयामध्ये आधी आरोग्य पत्र जमा करणे व ३१ ऑक्टोबर २0१३ पूर्वी काढलेल्या शिधापत्रिकाधारकांनाच या योजेनेचा लाभ देण्यात येत होता. एखाद्याचे उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे आणि त्याची शिधापत्रिका ३१ ऑक्टोबर २0१३ नंतरची आहे किंवा आरोग्य पत्र अद्याप प्राप्त झाले नाही अशा गोरगरिबांना या योजनेपासून वंचित ठेवल्या जात होते. त्यामुळे रुग्णालय प्रशासन आणि रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये वाद उद्भवले आहेत. रुग्णालयामध्ये सादर करावयाच्या शिधापत्रिकेच्या कालावधीचा गोंधळ आणि आरोग्य पत्रासोबतच इतर कागदपत्रांमुळे योजना वादग्रस्त ठरत असल्याचे दिसून येत होते; मात्र राज्य शासनाने आता रुग्णांना या योजनेचा लाभ विना कटकट करून देण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये रुग्णांना केवळ एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असल्याचे प्रमाणपत्र आणि कुठलीही शिधापत्रिका सादर करावी लागणार आहे. यासोबतच काही दिवसांनंतर आरोग्य पत्र सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांना या योजनेचा लाभ घेणे अधिक सोयीचे झाले आहे. ही अट शिथिल करण्यात आल्याने रुग्णांची ससेहोलपट थांबणार असून, या योजनेतील अडचणीही दूर करण्यात आल्या आहेत.
कागदपत्रांचा गोंधळ थांबला, जीवनदायीचे उपचार सुलभ
By admin | Published: June 30, 2014 1:14 AM