लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवारी शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली. ‘टीईटी’च्या पहिल्या पेपरदरम्यान जागृती विद्यालयात नातेवाइकांकडून एका परीक्षार्थीला उत्तरे सांगण्याचा आरोप करीत केंद्रावरील परीक्षार्थींनी गोंधळ घातला. या प्रकारामुळे परीक्षा केंद्रात काही काळ तणाव निर्माण झाला होता.महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणेमार्फत १९ जानेवारी रोजी शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली. पेपर एक आणि पेपर दोन अशा दोन टप्प्यात परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते. पहिला पेपर सुरू असताना जागृती विद्यालयात एका महिला परीक्षार्थीजवळ जाऊन तिच्या नातेवाइकाने प्रश्नांची उत्तरे सांगितल्याचा आरोप करीत इतर परीक्षार्थींनी गोंधळ घातल्याचा प्रकार रविवारी घडला. संबंधित महिला परीक्षार्थीचा नातेवाईक संस्थेचे अध्यक्ष असल्याची चर्चा आहे. हा प्रकार इतर परीक्षार्थींच्या निदर्शनास येताच त्यांनी गोंधळ घातला. या प्रकाराची माहिती मिळताच प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांनी जागृती विद्यालयाला भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी परीक्षार्थींनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे झालेल्या प्रकाराची लेखी तक्रार दिली. चौकशी दरम्यान त्या महिला परीक्षार्थीला वैद्यकीय समस्या असल्याचेही नातेवाइकांकडून सांगण्यात आले. परीक्षेदरम्यान कलम १४४ लागू असताना असा प्रकार घडणे योग्य नाही.७,४८७ परीक्षार्थींनी दिली परीक्षामहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत २९ केंद्रांवर शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली. पहिला पेपर १७ केंद्रांवर घेण्यात आला असून, परीक्षेला ४,६८१ पैकी ४,३५२ परीक्षार्थींची उपस्थिती होती. ३२९ परीक्षार्थी अनुपस्थित होते. दुसरा पेपर १२ परीक्षा केंद्रांवर घेण्यात आला असून, परीक्षेला ३,४२५ पैकी ३,१३५ परीक्षार्थींची उपस्थिती होती. २९० परीक्षार्थींची अनुपस्थिती होती. परीक्षेसाठी जिल्हा प्रशासनामार्फत ४ झोनल अधिकारी, २९ सहायक परीक्षक, २९ केंद्र संचालक, ५५ पर्यवेक्षक, २६० समवेक्षकांसह अन्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.परीक्षेदरम्यान झालेल्या गोंधळासंदर्भात चौकशी केली असून, परीक्षार्थींची लेखी तक्रार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे पाठविण्यात आली आहे. चौकशी दरम्यान संबंधित महिला परीक्षार्थीला वैद्यकीय समस्या असल्याचे सांगण्यात आले; परंतु यावर राज्य परीक्षा परिषदेकडूनच पुढील कारवाई होईल.- वैशाली ठग, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, जि. प. अकोला.
‘टीईटी’ परीक्षेदरम्यान गोंधळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 10:48 AM