अकोला: कोरोनाचा प्रादुर्भाव, तसेच अन्य तांत्रिक कारणांमुळे राज्य लोकसेवा आयोगाद्वारे करण्यात येणारी पदभरती, घेण्यात येणाऱ्या परीक्षा, नियुक्त्या रखडलेल्या आहेत. परीक्षांच्या तारखाच जाहीर झाल्या नसल्याने विद्यार्थी स्पर्धा परीक्षांच्या प्रतीक्षेत आहेत.
शेतकरी, शेतमजूर, कामगारांची मुले एमपीएससीची तयारी करीत आहेत. कोरोनामुळे गरीब सामान्य वर्गातील कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. अशातच मागील दीड ते दोन वर्षांपासून परीक्षा लांबणीवर जाणे, नियुक्त्या रखडणे, नवीन पदभरती न होणे हे विद्यार्थ्यांसाठी भयावह आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे शारीरिक, आर्थिक तसेच मानसिक खच्चीकरण होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे.
एमपीएससीमार्फत घेण्यात येणाऱ्या आरटीओची पूर्व परीक्षा होऊन दीड वर्ष झाले, तरीही निकाल लागलेला नाही. सहा. वन संरक्षकाच्या परीक्षेचा अंतिम निकाल गेल्या वर्षभरापासून लागलेला नाही. वर्ग-क च्या मंत्रालयीन पदांकरिता दोन वर्षांपासून जाहिरात नाही. तसेच कृषी विभागातील पदभरती रखडलेली आहे. पीएसआय पदासाठी, शारीरिक चाचणी दीड वर्षापासून झालेली नाही.
विद्यार्थ्यांचे वय निघून चालले!
कोरोना परिस्थितीत पुढे ढकललेल्या परीक्षांमुळे उमेदवारांच्या वयाचा प्रश्न आहे. दोन वर्षांपासून तर एकही जाहिरात नाही. अशा परिस्थितीतही परीक्षार्थी आर्थिक संकटाचा सामना करून परीक्षांच्या तारखा जाहीर नसतानाही तयारी करत आहे. राज्य सरकारने अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच आयोगाच्या सर्व जागा भरण्याचे आश्वासन दिले आहे. नव्या कमिटीने विद्यार्थ्यांचे सर्व प्रलंबित प्रश्न त्वरित सोडवावेत अशी अपेक्षा आहे. वय वाढत असल्याने समस्या वाढत चालल्या आहेत.
- शिवाजी विष्णू गरड, विद्यार्थी.
परीक्षा होत नसल्याने मुलांचे वय निघून जात आहे. परीक्षेच्या तयारीसाठी ते दुसरे जॉब करीत नाही. मुलींचे सामाजिक प्रश्न निर्माण झाले आहे. यासाठी सरकार आणि एमपीएससीही जबाबदार आहे. एमपीएससी आपल्या निर्णयावर ठाम नाही. सरकारचा हस्तक्षेप वाढला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
- सचिन मुंडे, विद्यार्थी.
यावर्षीच्या परीक्षांच्या तारखा कधी जाहीर होणार?
- गत दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट असल्याने परीक्षा कधी जाहीर होणार याबाबत संभ्रम आहे.
- एमपीएससीच्या परीक्षांच्या तारखा त्वरित जाहीर केल्यास विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी सोईस्कर होणार आहे.
ऑनलाईन क्लास किती दिवस चालणार?
१) कोरोनाला रोखण्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंग आवश्यक असल्याने सध्या क्लास हे ऑनलाईन पद्धतीने सुरू आहेत.
२) ऑनलाईन क्लास घेताना तांत्रिक अडचणी येत असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होते. तसेच मोबाईलवरच क्लास होत असल्याने डोळ्यांचे आजार वाढण्याची भीती आहे.
३) कोचिंग क्लासला परवानगी मिळाल्यास विद्यार्थ्यांसह क्लास चालकालाही दिलासा मिळणार आहे; मात्र कोरोनाचे संकट कायम असल्याने ऑनलाईन क्लास किती दिवस चालणार, याबाबत संभ्रम आहे.
क्लास चालकही अडचणीत !
क्लास बंद असल्याने शिक्षक व विद्यार्थ्यांचे नाते दुरावले आहे. विद्यार्थी एकट्यात अभ्यास करीत असल्याने नैराश्य निर्माण झाले असून, स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू होणे गरजेचे आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गत दीड वर्षांपासून क्लास बंद असल्याने क्लास चालकांवरही उपासमारीची वेळ आली आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी हे समजूतदार असतात. त्यामुळे ते कोरोना नियमांचे पालन करतीलच. अनलॉक प्रक्रियेत सर्व सुरू होत आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्याची परवानगी देऊन क्लास चालकांना दिलासा द्यावा.
- दीपक रामकृष्ण पठाडे, अध्यक्ष, विदर्भ स्पर्धा परीक्षा शिक्षक व विद्यार्थी संघटना.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्पर्धा परीक्षा केंद्र बंद असल्याने क्लास चालक अडचणीत आहेत. कोरोनाचे संकट कधी जाणार हे निश्चित नाही, तसेच दीड ते दोन वर्षांपासून परीक्षा लांबणीवर जाणे, नियुक्त्या रखडणे, नवीन पदभरती न होणे यामुळे विद्यार्थ्यांचा कल कमी होत चालला आहे. शासनाने स्पर्धा परीक्षांच्या तारखा व अंदाजे वेळापत्रक जाहीर करावे, तसेच अटी व शर्तीवर क्लास सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी.
अजित राऊत, क्लास चालक.